शासकिय आयएएस अधिकाऱ्यांची अदानी कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकातून माहिती मिठागराच्या जमिनी विकासासाठी सुरक्षितच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एसव्हीआर श्रीनिवास यांची माहिती

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अर्ध्याहून अधिक मुंबईतील शासकिय जमिनी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अदानी कंपनीच्या घशात घातल्या. त्या विरोधात दस्तूरखुद्द धारावी करांसह राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडूनही यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला. मात्र त्यांचा आवाज सत्ताधारी भाजपाच्या कानावर ऐकायला गेला असला तरी सत्ताधाऱ्यांचे कान बहिरे असल्याचे दिसून आले. हे कमी की काय आता राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी आता थेट अदानी कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकाचा आधार घेत शासकीय कामाची माहिती देण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतील मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीला देता याव्यात यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच त्या राज्य सरकारला सार्वजनिक प्रकल्पाच्या नावासाठी देता येतील अशी तरतूद मिठागरांच्या जमिनीसाठी करत त्यावरील निर्बंध उठविले. त्यानुसार राज्य सरकारने या मिठागरांच्या जमिनी अदानीला देऊन टाकले. आता या मिठागरांच्या जमिनीबाबतची माहिती देण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्याधिकारी तथा आयएएस अधिकारी एस व्ही आर श्रीनिवासन यांनी अदानी कंपनीच्या प्रसिद्धी यंत्रणांचा वापर करत मिठागरांच्या जमिनीची माहिती दिली आहे.

त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार तर सरकार आता राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी-अधिकारीही अदानीच्या कंपनीसाठी काम करायला लागले की काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सुमारे २५६ एकर मिठागरांची जमीन देण्यास मंजुरी दिली आहे. ही जागा मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरात असून, या जमिनीवर ‘अपात्र’ धारावी वासियांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पर्यावरणीय दृष्टीने काही जणांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला असतानाच, डीआरपीचे (धारावी पुनर्विकास प्रकल्प ) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, ही सर्व जमीन पूर्व द्रुतगतीमार्गाच्या पश्चिमेला असून, गेल्या अनेक वर्षांपासून समुद्र संपर्काबाहेर आहे आणि विकासासाठी पूर्णतः सुरक्षित आहे.

तसेच या जमिनींचा सॉल्ट कमिशनर ऑफ इंडिया यांच्याकडून अधिकृतरीत्या मीठ उत्पादनासाठी वापर बंद करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ इथे मीठ उत्पादन झालेले नाही. पूर्व द्रुतगतीमार्ग झाल्यानंतर समुद्राचे पाणी या भागात पोहोचलेले नाही. त्यामुळे येथे स्वस्त गृहप्रकल्प उभारणे कोणत्याही प्रकारे धोकादायक नाही,” असे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे. तर या जमिनी सीआरझेड (सागरी किनारा नियमन क्षेत्र) क्षेत्रात येत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

“खाडी व जलमार्गांत स्थलांतरित पक्षी, उदा. फ्लेमिंगो येतात, ते क्षेत्र पूर्वेकडे आहे. आपल्याकडे असलेल्या जमिनी पश्चिमेकडे असून, त्या ना जलमार्गाजवळ आहेत, ना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येतात. त्यामुळे कोणत्याही प्रकल्प संदर्भातील बांधकामास सुरुवात करण्यापूर्वी सर्व आवश्यक पर्यावरणीय मंजुरी घेण्यात येईल आणि सर्व कायदेशीर प्रक्रियांचे काटेकोर पालन केले जाईल,” असे श्रीनिवास यांनी आवर्जून नमूद केले आहे.

विकास आराखडा २०३४ अंतर्गत या जमिनी स्वस्त घरे बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. २०१८ मध्ये हा आराखडा मंजूर झाला आहे. यावेळी महानगरपालिकेत आणि राज्य सरकारमध्ये एकत्रित शिवसेना (एकनाथ शिंदे गट आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) सत्तेत होती.

हे ही वाचाः धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे झाले नामांतर आता राहणार एनएमडीपीएल असे नाव

यापूर्वी २००७ मध्ये काँग्रेस आघाडी सरकारनेही २,००० हेक्टर सॉल्टपॅन जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मुंबई विकास आराखड्यानुसार १० लाख स्वस्त घरे आवश्यक आहेत, त्यापैकी ३.५ लाख घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तर यासाठी “सॉल्टपॅन जमीन जमीन वापरता मुंबईचा पुनर्विकास शक्य नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

सध्या केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभाग वडाळ्यात ५५ एकर सॉल्टपॅन जमिनीवर कार्यालय व कर्मचारी निवास उभारत आहे. तसेच कांजूरमार्गमधील १५ एकर सॉल्टपॅन जमीन मेट्रो लाईन ६ (विक्रोळी ते स्वामी समर्थ नगर/ लोखंडवाला कॉम्प्लेक्स) साठी दिली आहे.

तर विशेष म्हणजे, मागील महाविकास आघाडी सरकारनेही कांजूरमधील याच मिठागरांच्या जमिनीचा वापर मेट्रोच्या चार मार्गांसाठी एकत्रित कारशेड उभारण्यासाठी करण्याचा प्रस्ताव दिला होता. या कारशेडमध्ये मेट्रो लाईन ३ (कोलाबा ते सीप्झ), लाईन ४ (कसारवडवली ते वडाळा), लाईन ६ आणि लाईन १४ (कांजूर ते अंबरनाथ) या मार्गांचा समावेश होता.

याच पार्श्वभूमीवर डीआरपी चे भागीदार असलेल्या एनएमडीपीएल संस्थेच्या प्रवक्त्यानी स्पष्ट केले की, “जेव्हा मेट्रो कारशेडसाठी सॉल्टपॅन जमीन वापरणे योग्य मानले गेले, तेव्हा गरिबांसाठी घरे बांधणे गैर का?” त्यामुळे “सॉल्टपॅन जमिनीच्या विरोधात बोलणाऱ्यांना मुंबईच्या भविष्यासाठी दूरदृष्टी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अदानी कंपनीने त्यांच्या लेटरहेडवर काढलेले प्रसिद्ध पत्रक खालीलप्रमाणे

Press Release – मिठागराच्या जमिनी विकासासाठी सुरक्षितच

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *