‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेत पुरस्काराचे वितरण

इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य ‘आयपीपीएआय पॉवर अवॉर्ड्स-२०२६’ मध्ये विविध सहा पुरस्कारांनी शनिवारी गौरविण्यात आले. यात विशेषतः स्मार्ट ग्रिड, रूफटॉप सोलर, बॅटरी स्टोरेज आणि विद्युत वाहन प्रोत्साहन या वर्गवारीमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले.

‘महावितरणने तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात घेतलेली झेप विद्युत क्षेत्रात मोठे बदल घडवून आणत आहे. हे पुरस्कार त्याची पावती आहे‘, अशी प्रतिक्रिया देत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे ७ ते १० जानेवारीला २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या विविध कामगिरीचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. यात १) स्मार्ट ग्रिड सोल्यूशन्सच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम उपयुक्तता (विजेता), २) छतावरील सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य (विजेता), ३) सर्वोत्तम बॅटरी स्टोरेज प्रकल्प (विजेता), ४) ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा साठवणूक तंत्र- आयटी अप्लिकेशन (नवोपक्रम पुरस्कार), ५) इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य (विजेता) आणि ६) ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया नियोजनातील सर्वोत्तम राज्य (उपविजेता) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनशाम प्रसाद, ऑल इंडिया डिस्कॉम असोसिएशनचे महासंचालक व केंद्रीय माजी ऊर्जा सचिव अलोक कुमार, पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशनचे माजी महासंचालक सुशील कुमार सुनी, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते महावितरणच्या वतीने मुख्य अभियंता संदीप पाटील, अधीक्षक अभियंता अमित कुलकर्णी, अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता संजय गवळी, संजय गायकवाड, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण, राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता कपिल जाधव, पवन देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारले.

या परिषदेत वितरण व पारेषण नियोजन, अक्षय ऊर्जेला (सौर व पवन) प्राधान्याने ग्रीडमध्ये सामावून घेताना येणारा ताण व आव्हाने, मागणीचा अंदाज आणि संसाधन पर्याप्तता नियोजन, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स, वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उपाययोजना, उदयोन्मुख तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग आदींवर चर्चा करण्यात आली. राज्य विद्युत नियामक आयोगांचे अध्यक्ष, वीज वितरण, पारेषण, निर्मिती व लोड डिस्पॅच सेंटर्संचे वरिष्ठ अधिकारी, अक्षय ऊर्जा, वित्तीय संस्था आदींचे देशभरातील सुमारे ५०० प्रतिनिधी उपस्थित होते.

इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या बेळगाव (कर्नाटक) येथील राष्ट्रीय परिषदेत महावितरणला विविध क्षेत्रातील सहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मुख्य अभियंता संदीप पाटील, अधीक्षक अभियंता अमित कुलकर्णी, अनिल गेडाम व सहकाऱ्यांनी हे पुरस्कार स्विकारले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, वांद्र्यातील एमएसआरडीसीची २४ एकर जमीन अदानीच्या घशात तर MSRDC चे ऑफिस दादरला २ कोटी रुपये भाड्याच्या जागेत

देवेंद्र फडणवीस सरकार दिल्लीच्या आदेशाने मुंबईतील मौल्यवान व अत्यंत महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *