नवी मुंबई: प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेने शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर येथे तीन नवीन रुग्णालये उभारली परंतु ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असून पालिका प्रशासनाने पाठविलेल्या डॉक्टर भरतीच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना केली.
२७ मे २०१९ रोजी या मागणीविषयीचे पत्र त्यांनी दिले.
पालिका रुग्णालयांमधून सर्वसामान्य नागरिक उपचार घेत असतात. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात विविध साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे पालिका रुग्णालयांमधून उपचारासाठी येणार्या नागरिकांची संख्या वाढते. अशा परिस्थितीत रुग्णालयांमधून पुरेसे डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे अन्यथा कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण पडत असतो. नवी मुंबई पालिकेने डॉक्टरांच्या पद निर्मितीचा बिंदू नामावली प्रस्ताव आणि नोंदवह्या तपासणीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविलेल्या आहेत. पालिकेने नवीन रुग्णालयांमधून परिचारिका भरती केलेली आहे. मात्र डॉक्टर भरती अद्याप झालेली नाही. वैद्यकशास्त्र तज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ अशा विविध वर्गवारीतील डॉक्टरांची नितांत गरज आहे. त्यांच्या अभावी रुग्णांना वैद्यकीय उपचाराच्या समाधानकारक सेवा दिल्या जाऊ शकत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून अत्यावश्यक सेवा बाब म्हणून शासनाने पालिकेच्या डॉक्टर भरती प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली.
Marathi e-Batmya