जागतिक कीर्तीचे तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन व प्रसिध्द उद्योजक शशिकांत गरवारे यांना मुंबई विद्यापीठाने मानद एल.एल.डी. व डी. लिट. पदवी देऊन सन्मान केला, हे अत्यंत अभिनंदनीय असून अशा सन्मानामुळे नव्या पीढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ लॉज् (एल.एल.डी) ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) पदवी देऊन सन्मान करण्यात आला. व डॉ. मुकुंद चोरघडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) पदवी देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. सुहास पेडणेकर, प्र- कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील, कुलसचिव सुधीर पुराणिक यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
इतर लोक आपल्या पुढे गेलेले राजकारण्यांना आवडत नाही; परंतु संगीत क्षेत्रात व इतर विद्याशाखांमध्ये आपला शिष्य आपल्याही पुढे जावा असे गुरुजनांना वाटते, हे विशेष महत्वाचे आहे. दुःखद प्रसंगी संगीत मनाला सांत्वन देते ही संगीताची शक्ती आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा दिली असते. या प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतर शाखीय अध्ययनास चालना देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासह संगीत देखील शिकण्याची व्यवस्था असेल असे सांगून या धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तर विद्यापीठांमधून झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांच्याप्रमाणे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लता मंगेशकर संगीत महाविद्यालय लवकरच सुरू होणार : उदय सामंत
ज्या उस्ताद झाकीर हुसेन यांचा तबला ऐकून आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसावयास मिळणे हा आपला बहुमान असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. लता मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय सुरु होईल असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम ठरविण्यासाठी झाकीर हुसेन, शंकर महादेवन, उषा मंगेशकर यांसारखे मान्यवर पुढे येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुंबई विद्यापीठातर्फे संगीत क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल मानद एलएलडी पदवीने सन्मानित होणारे पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन हे पहिलेच कलावंत आहेत. त्यांचा सन्मान करणे हे विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. तर सातत्य, संयम आणि चिकाटी या बळावर नवउद्योग विश्व निर्माण करणारे शशिकांत गरवारे यांना डी.लिट. पदवी देऊन सन्मान करणे ही भूषणावह असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुंबई विद्यापीठ आगेकूच करत असून त्यादृष्टिने विद्यापीठाने सेंटर ऑफ एक्सलंस, स्टडी सेंटर्स, स्कूल संकल्पना, उद्योन्मुख क्षेत्रातील पदवी आणि पदव्यूत्तरचे अभ्यासक्रम, नवीन उपपरिसर, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाची जोड असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मुंबई विद्यापीठ येणाऱ्या नजीकच्या काळात संपूर्णतः डिजिटल विद्यापीठ म्हणून उदयास येणार असल्याचा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाची पदवी हा बहुमान : उस्ताद झाकीर हुसेन
भारतातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी हा मोठा बहुमान असून हा सन्मान आपण आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो असे सत्काराला उत्तर देताना उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितले. जीवनात गुरु होण्याचा प्रयत्न न करता उत्तम शिष्य होऊन रहा असा सल्ला आपल्याला वडिलांनी दिला होता व तो आपण पाळत आहोत असे सांगून आज अनेक उत्तमोत्तम संगीतकार असून आपण केवळ त्यापैकी एक असल्याचे विनम्र उद्गार झाकीर हुसेन यांनी यावेळी काढले.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या विशेष दीक्षांत सोहळ्यात उद्योगपती शशिकांत गरवारे यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही पदवी बहाल करून सन्मान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कन्या मोनिका गरवारे यांनी पदवीचा स्वीकार केला. तर रसायन शास्त्रातील योगदानाबद्दल वैज्ञानिक डॉ मुकुंद चोरघडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या या विशेष दीक्षान्त समारंभासाठी संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन आणि त्यांच्या समवेत मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदक विजेते माजी विद्यार्थी यांनी त्यांचा कलाविष्कार सादर केला. यामध्ये आदित्य कल्याणपूर – तबला, गुलराज सिंह – सिंथेसायझर, सागर साठे – हार्मोनियन, विजय जाधव – ढोलकी, स्विकार कट्टी – सितार, सुमीत चाचे – गिटार, सुजेश मेनन – मृदंगम, मयुर मगरे – साईड ऱ्हीदम यांचा समावेश होता.
Marathi e-Batmya