Breaking News

पंतप्रधान मोदी यांचा दावा, देशात ३ ते ४ वर्षात आठ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या नेस्कोच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान मोदीचे वक्तव्य

रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात भारतात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि या आकडेवारीने नोकऱ्यांबद्दल खोटे कथा पसरवणाऱ्यांचे दावे उघडे पडले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी करत कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि आमचे सरकार या दिशेने काम करत असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरेगाव येथील नेस्कोच्या NESCO मैदानावर आयोजित कार्यक्रमात २९ हजार ४०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. शहरातील ठाणे आणि बोरीवली दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मार्गिकेच्या भूमिगत दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पांचे “भूमीपूजन” ही केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹ ५,६०० कोटी खर्चासह ‘मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना’ची सुरुवातही केली.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वंचितांना पुढे आणण्याचे एनडीए सरकारचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही ४ कोटी लोकांना पक्की घरे उपलब्ध करून दिली आहेत आणि येत्या काही वर्षांत आम्ही आणखी ३ कोटी लोकांना पक्की घरे देऊ असेही यावेळी जाहिर आश्वासन दिले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वनिधी योजना योजनेअंतर्गत आम्ही ९० लाख लोकांना लाभ दिला आहे. मुंबईत दीड लाख लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. ज्यांनी स्वनिधी अंतर्गत कर्ज घेतले आहे ते देखील संपूर्ण कर्ज परत करत असल्याचे सांगितले.

मुंबई मेट्रोबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई मेट्रो प्रकल्पाची गतीही चांगली आहे. १० वर्षांपूर्वी मेट्रो फक्त ८ किलोमीटर पर्यंतच धावत होती. पण ती आज ८० किलोमीटरपर्यंत पोहोचली नाही तर शहराच्या परिसरातील २०० किलोमीटरहून अधिक मार्गापर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई आणि त्याच्या शेजारील भागात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. अटल सेतू पूल होत असताना लोक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होते पण आज या प्रकल्पाचा फायदा शहराला होत आहे. मला सांगण्यात आले आहे की आज २०,००० हून अधिक वाहने अटल सेतू पुलाचा वापर करत आहेत. प्रदूषण कमी झाले असून लोकांचा पनवेलला जाण्याचा वेळही वाचत आहे. त्यामुळे केवळ लोकांनाच नाही तर पर्यावरणालाही या प्रकल्पाचा फायदा होत असल्याचेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मुंबई हे अनेक उत्सवांचे माहेर बनले आहे. शहराने आमच्या विजयाचे जल्लोषात स्वागत केले आहे.
लोकांना माहित आहे की केवळ एनडीए सरकार स्थिरता आणू शकते. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तिप्पट गतीने काम करेल, असे मी म्हटले होते. आणि आज आपण ते घडताना पाहत आहोत. महाराष्ट्राला समृद्ध इतिहास, वर्तमान आणि भक्कम भविष्याचे स्वप्न आहे. विकसित भारतमध्ये महाराष्ट्राची भूमिका ठाम आहे. महाराष्ट्रात उद्योग, कृषी आणि वित्त क्षेत्राची ताकद आहे. या शक्तीने मुंबईची आर्थिक राजधानी बनवली आहे आणि मुंबईला फिनटेक राजधानी बनवण्याचे माझे ध्येय असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मला मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सुमारे ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तुम्ही वाचले असेल आणि पाहिले असेल, दोन-तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनेही वाढवण बंदराला मंजुरी दिली. या ७६००० कोटींच्या प्रकल्पामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल असेही यावेळी सांगितले.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रशियामध्ये पंतप्रधान मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल’ हा किताब मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित होणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय नेते आहेत.

१६,६०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प बोरिवली आणि ठाणे घोडबंदर रोड येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडणार आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास १२ किमीने कमी होईल, प्रवासाच्या वेळेत सुमारे १ तासाची बचत होईल, असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR), ६,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा, गोरेगाव येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला मुलुंड येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडेल. यामुळे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होईल.

“तसेच ते नवी मुंबईतील तुर्भे येथे मध्य रेल्वेच्या कल्याण यार्ड रीमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलची पायाभरणी करणार आहेत. याव्यतिरिक्त, ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म १० आणि ११ चा विस्तार राष्ट्राला समर्पित केला.

Check Also

दीपक केसरकर यांची माहिती, मुंबईसाठी ४९० कोटी रूपयांचा निधी स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

मुंबई हे राजधानीबरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *