विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळं आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून, प्रचारात सत्ताधारी-विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चर्चेतील आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. इथे भाजपाचे राम कदम हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत विजयाची हॅट्रिक साजरी केली आहे. ते चौथ्यांदा गड राखणार की? घाटकोपरकर येथे बदल घडवणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे संमिश्र समाजातील आणि बहुभाषिक लोकवस्ती आहे. चांगले रस्ते, वाहतूक कोंडी आणि झोपडपट्टी पुनर्वसन आदी मुद्दे या मतदारसंघात दिसून येतात. घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचा कसा आहे इतिहास? कोणकोणत्या समस्यांना लोकांना सामोरी जावे लागतेय? आणि येथे पक्षीय बलाबल कसे आहे? याचा आपण आज आढावा घेणार आहोत. तसेच येथे यावेळी उबाठा गटाचे संजय भालेराव, भाजपाचे राम कदम, मनसेचे गणेश चूक्कल आणि वंचितचे सागर गवई यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळं यात कोण बाजी मारतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसा आहे मतदारसंघाचा इतिहास?
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. मुंबई उपनगरात जिल्ह्यात हा मतदारसंघ येतो. तसेच या मतदारसंघात अनेक महापालिकेतील वॉर्ड येतात. २००८ रोजी या मतदारसंघाची रचना करण्यात आली. यानंतर २००९ विधानसभा निवडणूकीनंतर सलग तीन वेळा राम कदम हे विजय होत विजयाची हॅट्रिक केली आहे. २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राम कदम हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन वेळेस भाजपातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ विधानसभा निवडणुकीत मनसेच्या राम कदम यांनी भाजपाच्या पूनम महाजन यांचा मोठ्या मताधिक्कांने पराभव केला होता. २०१४ मध्ये राम कदम यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. भाजपातून २०१४ साली पहिल्यांदा निवडणूक लढवत निवडून आले. दरम्यान, या मतदारसंघात जवळपास पावणेतीन लाख मतदार आहेत. यात तब्बल दीड ते पावणेदोन लाख मराठी मतदार आहेत. यात राम कदमांचा एक वेगळा मतदार आहे. कारण राम कदमांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
मतदारसंघात काय आहेत समस्या?
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात पूर्वी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या होत्या. परंतु आता झोपडपटी पुनर्वसन झाल्यामुळं आता इथे झोपडपट्टीची जागा गगनचुंबी इमारतींनी घेतल्या आहेत. तर अजूनही अनेक झोपडपट्ट्या पुनर्वसनांच्या प्रतीक्षेत आहेत. त्या झोपडपट्टीत पाणी, वीज तसेच विभागात चांगले रस्ते पाहिजेत. असं मतदारसंघातील मतदारांचे म्हणणे आहे. इथे सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. तसेच इथे भाजपाचे आमदार राम कदम यांनी काही महत्त्वपूर्ण कामं केली आहेत. मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध शिबिर, तीर्थ यात्रा घडवणे…, आदी कामांमुळं राम कदम यांचा एक वैयक्तिक मतदार वर्ग असल्याचं बोललं जातंय. परंतु या मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आत्ताच्या निवडणुकीत जो आमदार निवडून येईल, त्यांने हा मुद्दा सोडवावा असंही लोकांचा म्हणणं आहे.
पक्षीय बलाबल कसे आहे?
२००८ नंतर या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आहे. त्यानंतर तीन वेळा राम कदम आमदार आहेत. २००९ साली मनसेतून ते निवडून आले होते. त्यावेळी त्यांना ६०,३४३ एवढी मतं मिळाले होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ८० हजार ३४३ मते मिळाली होती. तर २०१४ नंतर राम कदम हे भाजपात आहेत. २०१९ साली सुद्धा राम कदम यांनी मोठा विजय मिळवला होता. यावेळी त्यांना ७०,२६३ मते मिळाली होती. घाटकोपर पश्चिम हा भाजपाच्या गड मानला जात असून, येथे भाजपाची ताकद आहे. भाजपाच्या तुलनेत शिवसेना आणि मनसेचेही मतदार येथे आहेत. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतांमध्ये विभागणी झाली आहे. आता महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीसुद्धा भाजपाचे राम कदम यांचा इथे विजय मानला जातोय. परंतू यावेळी भाजपाचे राम कदम याचे वर्चस्व असले तरी, त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे संजय भालेराव, तसेच मनसेचे गणेश चूक्कल आणि वंचितचे सागर गवई यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळं यामध्ये कोण बाजी मारतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील निकाल काय सांगताहेत?
२०१९ विधानसभा निवडणूक निकाल?
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
राम कदम भाजपा ७०,२६३
संजय भालेराव अपक्ष ४१,४७४
गणेश चुक्काल मनसे १५,०१९
आनंद शुक्ला काँग्रेस ९,३१३
गणेश ओवराल वंचित ८,०८८
२०१४ विधानसभा निवडणूक निकाल?
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
राम कदम भाजपा ८०,३४३
सुधीर मोरे शिवसेना ३८,४२७
दिलीप लांडे मनसे १७,२०७
हारुन युसुफ खान राष्ट्रवादी कॉंग्रेस ७,४२६
२००९ विधानसभा निवडणूक निकाल?
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
राम कदम मनसे ६०,३४३
पूनम महाजन भाजपा ३४,११४
मुकुंद थोरात अपक्ष ८,०९६
Marathi e-Batmya