राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास आजपासून सुरु झाले. या अधिवेशनात पहिले दोन दिवस निवडूण आलेल्या सदस्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी भाजपा आणि महायुतीतील असे मिळून १७३ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी बहुतांश आमदारांनी मराठीत शपथ घेतली. तर काही जणांनी संस्कृत, उर्दू आणि हिंदी भाषेत शपथ घेतली.
१७३ आमदारांच्या शपथविधीमध्ये १६० जणांनी मराठी भाषेत, ७ जणांनी संस्कृतमध्ये, २ जणांनी हिंदी, तर सिंधी आणि उर्दू भाषेत प्रत्येकी एका लोकप्रतिनिधीने शपथ घेतली. समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि भाजपाचे पराग शहा यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. भाजपाचे कुमार आयलानी यांनी सिंधी, तर समाजवादी पक्षाचे मुफ्ती अहमद खालिद यांनी उर्दूमध्ये विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
१. पुणे येथील कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार हेमंत रासणे प्रथमच सभागृहात आल्यामुळे त्यांना कुठे बसायचे हे समजले नाही. ते विरोधकांसाठी असलेल्या आसनावर बसले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेऊन आल्यावर हेमंत रासणे यांना घेऊन ते महायुतीच्या आमदारांसाठी असलेल्या आसनावर घेऊन आले.
२. सना मलिक यांनी मराठी भाषेत शपथ घेतली.
३. अनेक आमदारांनी शपथ विधीच्या वेळी ‘जय श्रीराम’ असा जयघोष, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मरण केले. शिवसेनेच्या काही आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले.
४. अनेक नवनियुक्त आमदारांनी शपथविधीच्या वेळी ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला. शिवसेनेचे वैजापूर मतदारसंघातील आमदार रमेश बोरनारे यांनी शपथ घेण्यापूर्वी साधूसंत आणि जनता जनार्दन यांना वंदन केले. काही आमदारांनी स्वत:च्या संप्रदायातील आराध्य संत आणि देवता यांचे स्मरण केले.
५. भाजपचे आमदार पराग शहा यांच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे त्यांना चाकाच्या आसंदीवरून सभागृहात आणण्यात आले. अन्य आमदारांनी त्यांना धरून व्यासपिठावर नेल्यावर त्यांना शपथ घेता आली.
६. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहात फेटे बांधून आले होते.
Marathi e-Batmya