भावना गवळी शिंदे गटात तर त्यांचे घटस्फोटीत पती उध्दव ठाकरे गटात आज अधिकृत रित्या केला प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षनेतृत्वाच्या विरोधात पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळी चूल मांडली. त्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली. अनेक खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यातच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील शिंदे गटात सामील झाल्या. मात्र भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांनी आज उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचे भाऊ संजय जाधव यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.

प्रशांत सुर्वे हे व्यवसायाने वैमानिक असून त्यांनी अनेक वर्षे एअर इंडिया आणि इंडियो विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम केले आहे. २०१४ साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

दरम्यान, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चाचपणी केली होती. पण त्यावेळी शिवसेना पक्षात भावना गवळी असल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यास नकार दिला होता. पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. भावना गवळी शिंदे गटात सामील झाल्या आहेत. त्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. २०१३ साली भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा घटस्फोट झाला होता.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, २०१३-१४ साली आपण शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंकडे विचारणा केली होती. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मला हे योग्य वाटत नाही. मी पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देऊ शकणार नाही. त्यावर मी त्यांना आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं सांगितले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला थांबवलंय नाही किंवा पाठिंबाही दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे खूप वर्षांपासूनचे संबंध आहेत. हे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढे आपण एक शिवसैनिक म्हणून वाशिम जिल्ह्यासाठी काम करू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले पण भाजपाच्या दुबेला मात्र मोकळीक पंडित नेहरु, इंदिरा गांधींबद्दल अश्लील शब्द वापरून बदनामी करणाऱ्या भाजपा खासदार निशिकांत दुबेला निलंबित करा

लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *