खाते वाटपानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू महसूल विभाग 'जनता सर्वोपरी' ठरवू, झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार

जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू” अशी घोषणा राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत पुढे म्हणाले की, ” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू असेही यावेळी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. महसूल विभागामुळे जनतेला त्रास होतो आहे; हे मी बघू शकणार नाही. ‘जनता सर्वोपरी..’ असे आपले कामजाजाचे धोरण राहणार असून देशातील सर्वांत चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख मी निर्माण करेन, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात सुमारे ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न प्रलंबित असून, यामुळे अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. या जमिनी प्रामुख्याने विदर्भात अधिक असून, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. याखटल्याच्या बाबतीत न्यायालयात पाठपुरावा करून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असेही यावेळी सांगितले.

जनतेचे हेलपाटे कमी करू

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शेतकरी-शेतमजूरांशी संबंधित असणाऱ्या या खात्यात अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून राज्याच्या विकासाची गती वाढविण्यात येईल, कागदपत्रांशी निगडित नागरिकांची महसूल खात्याशी संबंधित अनेक कामे असतात. नागरिकांना या कामांसाठी तलाठी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय ते शासनस्तरापर्यंत कमीत कमी हेलपाटे मारून काम कसे करता येईल, यासंबंधी लवकरच उपाययोजना आखू आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देवू असे आश्वासनही यावेळी दिले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, मुद्रांक शुल्क, जमाबंदी आयुक्त तसेच वाळूशी संबंधित धोरणांमध्ये सुलभीकरण करण्याचा तसेच वाळूमाफियांना पूर्णपणे पायबंद घालण्याचा माझा प्रयत्न आहे, धोरण प्रक्रियेत सुलभीकरण आणण्यासाठी इतर राज्यांतील उपयुक्त कायद्यांचाही अभ्यास करणार असून येत्या काळात महसूल विभागात सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील असेही यावेळी सांगितले.

सरकारमध्ये योग्य समन्वय

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बहुपक्षीय सरकार समजुतीने चालवावे लागते. त्यासाठी समन्वय आवश्यक असतो. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, खातेवाटपामध्येही तो दिसून आला आहे. तसेच, पालकमंत्री पदांचे वाटप करतानाही कोणतीही कुरबूर न होता आमचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून पालकमंत्री पदांचे वाटप करतील, असा विश्वासही व्यक्त करत छगन भुजबळ हे महायुतीतील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, असेही छगन भुजबळ यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राहुल गांधी यांचा दौरा म्हणजे नौटंकी

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांचा परभणी येथील दौरा हा नौटंकी आहे. परभणी येथे घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी असून, घटनेतील आरोपी मनोरुग्ण आहे. आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या संदर्भात स्पष्टीकरण दिले. तरीसुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीचा दौरा करत आहेत. परंतु, मागासवर्गीय, ओबीसी असे सर्व समाज राज्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असून, कोणताही समाज त्यांच्या या राजकारणाला बळी पडणार नाही. काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. डॉ आंबेडकर हे संसदेच्या कोणत्याही सभागृहात येऊ शकणार नाहीत, यासाठी राजकारण केले. त्यामुळे जनतेलाही काँग्रेस आणि राहुल गांधी यांची नौटंकी कळत असल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका

राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *