राष्ट्रवादीचा इशारा, २४ तासाच्या आत सत्तारांची हक्कालपट्टी करा अन्यथा…

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ऑन कॅमेरा शिवी देत अवमान केला. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत हक्कालपट्टी करण्याची आग्रही मागणी केली.

विशेष म्हणजे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या विधानावर अद्याप कोणताही खुलासा केला नाही की सुप्रिया सुळे यांची माफीही मागितली नाही. परंतु सत्तार यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रातून दिला.

विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणा पलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध महेश तपासे यांनी केला.

खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

About Editor

Check Also

शिवसेना उबाठाच्या त्या सहा बंडखोर खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले रात्री राजस्थान वरून मुंबईत येण्याची शक्यता

काल शिवसेना उबाठा पक्षाने बोलाविलेल्या बैठकीसाठी दिल्लीतील खासदारांना व्हिप जारी केल्यानंतरही ते सहा बंडखोर खासदारांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *