Breaking News

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून ७-८ वेळा निवडणूक लढवलीय आता… सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत जनताच निर्णय घेईल

मागील काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यातच अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. या निमित्ताने महिला वर्गाला आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद संवाद साधला, त्यावेळी त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत वेगळेच संकेत दिल्याने राजकिय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांची बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या पत्नीचा पराभवही झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती चूक होती अशी कबूली दिली. त्यातच बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि शरद पवार यांच्यासोबत असलेल्या युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याचा घाट शरद पवार यांच्या पक्षाकडून घातला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरूध्द पवार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत असताना अचानकपण अजित पवार यांनी बारामतीतून विधानसभेची निवडणूक न लढण्याचे संकेत दिले.

यासंदर्भात अजित पवार यांना विचारले असता म्हणाले की, बारामतीतून मी आतापर्यंत ७-८ वेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे सांगितले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मग बारामतीतून जय पवार यांना उमेदवारी देणार का असा सवाल केला. त्यावर जय पवारच्या बाबत तेथील जनता आणि पक्षाची पार्लमेंटरी समितीच निर्णय घेईल. त्यामुळे त्याबाबत मी आताच बोलणे योग्य होणार नाही.

याबाबत अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना विचारले असता, ते म्हणाले की, अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते निवडणूकीच्या रिंगणात असतील. मात्र ते प्रसारमाध्यमांशी काय बोलले त्याची माहिती मला नाही. मात्र ते आता येतील आणि त्यानंतर आमच्यात चर्चा होईल असे सांगत विधानसभा निवडणूक अजित पवार लढवतील हे मात्र नक्की असेही यावेळी सांगितले.

याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, त्यांच्या पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड म्हणजेच स्वतः अजित पवार हेच आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाचा राहणार आहे. बाकीचे त्या बोर्डात कोणी असले काय आणि नसले काय कोण बघतो असा उपरोधिक टोला लगावत पण तो त्यांच्या पक्षातील मुद्दा आहे. ते त्यावर निर्णय घेतील असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *