बारामतीत पवार कुटुंबियांच्या होम टर्फवर अजित पवारांचा नमो रोजगार मेळावा

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह इतर कार्यक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांच्या प्रमुख उपस्थितीत २ मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे.

महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात बारामती येथे होणाऱ्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार’ मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक झाली.

बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, राज्य नाविन्यता व कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळसिंग राजपूत, रोजगार आयुक्तालयाचे उपायुक्त डी. डी. पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, कौशल्य विकास मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप हिरवाळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, विविध जिल्ह्यांचे व विभागांचे क्षेत्रीय अधिकारी, बारामती येथील स्थानिक अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना बारामतीत २ मार्चला ‘नमो महारोजगार’ मेळाव्याबरोबरच बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन, पोलिसांसाठीच्या घरांचे लोकार्पण, पोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण, सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन, बारामती बसस्थानकाचे लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत असे म्हणाले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारक, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पार्श्वभूमीवर विभागीय महसूल आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, एसटी महामंडळ, नगरपालिका आदी संस्थांनी या सर्व कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, बारामती येथे २ मार्च रोजी एकदिवशीय नमो महारोजगार मेळावा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, इतर विभागस्तरीय मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता बारामती येथील पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार’ मेळावा आता २ आणि ३ मार्च असा दोन दिवस आयोजित करण्यात यावा. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्याकरिता बंदिस्त दालन, विविध स्टॉल्स, पिण्याचे पाणी, कार्यक्रमस्थळी स्वच्छतेच्या सुविधा, वाहनतळ, अल्पोपहार, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर आदी सुविधांची उत्तम व्यवस्था करावी. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छूक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी आणि औद्योगिक संस्थांनी आजच नोंदणी करावी. या मेळाव्यामध्ये युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी (for candidate registration) https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियुक्त्यांसाठी (For Employer registration) https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *