मुंबईः प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शासकिय सल्लागार अजोय मेहता यांची आता महारेरा अर्थात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील निवृत्त सनदी अधिकारी गौतम चटर्जी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या ठिकाणी मेहता यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव पदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
साधारणतः ८ महिन्यापूर्वी मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सल्लागार म्हणून अजोय मेहता यांना नियुक्त करण्यात आले. कोरोना काळात प्रशासकिय आणि आर्थिक बाबीवर सल्ला देण्याचे काम मेहता यांनी उत्तम प्रकारे केले. त्यामुळे रेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांचा ही याच कालावधी संपत असल्याने त्यांच्या रिक्त पदावर मेहता यांची औपचारीक नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी मेहता यांचे नाव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी चर्चेत होते. मात्र त्या पदाबाबत विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांनी रस दाखविल्याने त्यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे.
राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे ही याच महिन्यात फेब्रुवारी २८ ला सेवा निवृत्त होत आहेत. मात्र त्यांची वर्णी नियामक आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती होणार असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
Marathi e-Batmya