स्थानिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची युती शिवसेना व रिपब्लिकन सेना यांची युती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवा भिडू मिळाला आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटासोबत प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती यापुर्वीच झाली असून आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आज या दोन्ही नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परीषद घेत रिपब्लिकन सेना आणि शिवसेनाओएफसीच्या युतीची घोषणा केली.

सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार, विश्वास आणि विकास या त्रिसुत्रीवर आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली. नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. रस्त्यावर अन्यायाविरोधांत लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं आता डीसीएम अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करत असल्याचेही यावेळी सांगत सर्वसामान्य माणूस, कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. तळागाळातील माणसाची नाळ तुटता कामा नये, हे आजवर पथ्य पाळले. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. संविधान सर्वोच्च असून त्यात सर्वसामान्य घटकाला न्याय मिळाला पाहिजे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. बाबासाहेबांचे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी सत्तेचा उपयोग करायला हवा. विचार, विश्वास आणि विकास या अजेंड्यावर काम करायचे आहे. ठाण्यात शिवशक्ती आणि भिमशक्ती युतीला सुरुवात केल्याची आठवण सांगत दोन्ही पक्ष हे कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत. त्यामुळे ही युतीची जोडी जमेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक त्यांना घरगडी समजू लागले तिथेच गाडी फसली, स्वभाव आणि मन जुळायला लागतात तरच युती होते, असा टोला शिवसेना उबाठाला लगावत शिवसेना-रिपब्लिकन सेना युती ही जनतेच्या भल्यासाठी असल्याचेही यावेळी सांगितले.

तसेच रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर म्हणाले की, शिवसेना रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय बदल घडून येतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी पहिल्यांदाच वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, संविधान कधीच धोक्यात नव्हते. मात्र विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी फेक नरेटिव्हचा वापर केला. लोकांनी त्यांना विधानसभा निवडणकीत जागा दाखवली. जोवर सूर्य चंद्र आहेत तोवर डॉ. बाबासाहेबांचे संविधान कायम राहणार, आहे. संविधान धोक्यात आहे असं म्हणणाऱ्यांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे, अशी टीका यावेळी विरोधकांवर केली. महायुतीने अडीच वर्षात केलेल्या कामांमुळेच जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले, जगाला हेवा वाटेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक इंदू मिल येथं साकारलं जाईल, असा विश्वासही व्यक्त केला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *