अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. आज अधिवेशनाचे सूप वाजत आहे. मागील ३ मार्चपासून हे अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळे गाजले आहे. सामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा अन्य विषयामुळे… अन्य कारणामुळे हे अधिवेशन गाजले. दरम्यान, आज विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध आणि एकमताने निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज या ठिकाणी उपाध्यक्ष पदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. बनसोडे यांनी बराच काळ समाजकारण, राजकारणात काम केले आहे. महानगरपालिका नगरसेवक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्ष पदी असा त्यांचा प्रवास हा नक्कीच अभिमानास्पद आहे. विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर आणि अण्णा बनसोडे या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल, अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. महाराष्ट्र विधानमंडळाला फार मोठी परंपरा आहे. आणि या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. भारताचे संविधान किती मोठे आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळते. संधीची समानता हे संविधानामुळं मिळाली आहे. आज बघू शकतो की, चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले. ऑटो रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि एक पान टपरीवाला राज्याचे उपाध्यक्ष झाले आहे, असं कौतुकही यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर विधानसभा सदस्यांसमवेत 'महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी निवडून आलेल्या अण्णा दादू बनसोडे' यांचे उपाध्यक्षांच्या आसनवार स्वागत केले.
(विधानसभा, मुंबई | दि. 26 मार्च 2025)… pic.twitter.com/OG6bUZq9l6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2025
विधानसभेत उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांचे कौतुक केले. तर विरोधी पक्षावर उपासात्मक टीका केली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस बोलल्यानंतर विरोधकांनी पण विरोधी पक्षनेते पदाचे काय? असा सवाल विरोधकांनी केला, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझी आताही तयारी आहे. जो विरोधी पक्षनेता असेल त्याला माझी संमती आहे. पण हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. तो जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे उत्तरही दिले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अण्णा बनसोडे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, यावेळी २०१९ विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडेंना पक्षाकडून एबी फॉर्म आपण कसा दिला. याबद्दल मजेशीर किस्सा अजित पवारांनी सांगितला. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.
Marathi e-Batmya