मुंबई शहर व उपनगरातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या ‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक ४ हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलवर इयत्ता पाचवी ते आठवीतील ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थिनींसाठीची शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे. तसेच मुंबईतील माध्यमिक शाळांमधील व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि दारिद्र्यरेषेखालील व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी पात्र खासगी विनाअनुदानित अथवा कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण व परीक्षा शुल्काची योजनाही राबविण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी या योजनांची माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. तसेच अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://scholarships.gov.in या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज सादर करावा. त्रुटी असलेल्या अर्जांची तसेच संस्थास्तरावरील पडताळणी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
Marathi e-Batmya