Breaking News

कोअर बैठकीनंतर आशिष शेलार यांचा विश्वास, विधासभा निवडणुकीत महायुतीच पंकजा मुंडे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ग्वाही

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरली असून महायुतीतील सहकारी पक्षांसोबत भाजपा लढणार आहे. सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी शनिवारी व्यक्त केला.

भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ. आशिष शेलार बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. आपल्या सर्व सहकारी मित्रपक्षांना साथीला घेऊन राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील योजनांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी १० जुलैपर्यंत अभियान राबविले जाणार आहे, असल्याचेही सांगितले.

भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या कोअर कमिटी बैठकीला भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सहसहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

आ. शेलार यांनी सांगितले की, या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा झाली. या निवडणुका भाजपा मित्रपक्षांच्या साथीनेच लढविणार असून महायुतीच्या विजयाचा रोडमॅप तयार झाला आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून मांडला असून सर्व घटकांचे हित साधण्याचा उत्तम प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आले. शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवा वर्ग अशा समाजातील सर्व घटकांच्या हितार्थ सर्वसमावेशक विकासासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारच्या आभिनंदनाचा ठरावही या बैठकीत झाल्याचे त्यांनी नमूद केले. १० जुलै पर्यंत २८८ विधानसभा मतदारसंघांमधील ७०० हून अधिक मंडलांमध्ये सहकारी पक्षांसोबत प्रत्यक्ष जाऊन अर्थसंकल्पाच्या तरतुदींची विस्तृत माहिती जनतेला देण्यात येणार आहे तसेच अर्थसंकल्पाबाबत जनतेचा अभिप्राय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्षातील पत घसरली
लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव झाला. यापूर्वीच्या विधानसभा निवडणूकीतही पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र पंकजा मुंडे यांचा मानणारा एक वर्ग असून या वर्गासाठी त्या नेत्या म्हणून आजही आहेत. परंतु राज्यातील निवडणूकीत पराभव झालेला असला तरी पंकजा मुंडे यांचे राजकिय पुर्नवसन करण्यासाठी भाजपाने पक्षाच्या केंद्रीय सचिव पदी नियुक्ती करत मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपविली. मात्र लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर मात्र पंकजा मुंडे यांची राजकिय पक्षातील पत कमी झाली की अशी चर्चा भाजपामध्येच सुरु झाली असून मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेला पंकजा मुंडे यांना बाजूला उभा करण्यात आल्याने या चर्चेला आणखीनच पुष्टी मिळत असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणूकीतील पराभवनानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कधी विधान परिषदेवर संधी देणार म्हणून चर्चेत आले होते. तर कधी राज्यसभेच्या निवडणूकी दरम्यानही भाजपाकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु होती. मात्र आतापर्यंत दोन वेळा पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत असूनही पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर ना संधी मिळाली ना राज्यसभेवर भाजपाने पाठविले. परंतु वास्तविक पाहता पक्षाच्या केंद्रीय सचिव पदावर कार्यरत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मुंबई अध्यक्षाच्या पत्रकार परिषदेला असे साईडला उभे करणे आतापर्यंतच्या भाजपाच्या इतिहासात कधी घडली नाही. परंतु आज आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेला पंकजा मुंडे यांना साईडला उभे करत त्यांचे पक्षातील राजकिय वजन घटले की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

शरद पवार यांचा मार्मिक सवाल, खिशात ७० रूपये तर मग १०० कसे खर्च करणार? अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा असल्याची केली टीका

खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *