राज्यात नव्याने सत्तेवर स्थानापन्न झालेल्या संशयातीत बहुमाताचा आकडा गाठणारे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. सांसदिय प्रथेप्रमाणे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्याद्वारे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करणे आदी गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विधानसभेचे खास अधिवेशन उद्या ७ तारखेपासून बोलावले आहे. तसेच या विशेष अधिवेशनासाठी भाजपाचे आमदार कालीदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना राज्यपालांनी शपथ दिली.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे शनिवार, ७ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी ११ वा. आयोजित केली असल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली.
याच बरोबर महाराष्ट्र विधान परिषदेची बैठक सोमवार, ९ डिसेंबर, २०२४ रोजी दु.४ वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.
कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ
विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली.
राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली.
Marathi e-Batmya