राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या उमेदवारानं बाजी मारल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाचे तीन तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला. या पार्श्वभूमवीर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. एकीकडे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी काही अपक्ष आमदारांनी भाजपा उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप केला असताना त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत टीका केली.
निवडणुकीच्या निकालासंदर्भात मुंबईतील भाजपाच्या जल्लोष कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला टोला लगावत म्हणाले की, मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही बेईमानीने राज्य घेतलं असले, तरी तुम्ही राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्याप्रमाणे वागलं पाहिजे. फक्त सूडाच्या भावनेनं याचं घर पाड, त्याचं घर पाड… मी नशीबवान आहे की माझं मुंबईत घरच नाहीये. मला नोटीस द्यायची म्हटलं तर सरकारी बंगल्यालाच नोटीस पाठवावी लागेल. नाहीतर राणेसाहेब मलाही नोटीस आलीच असती. मुंबईत घर नाही आणि नागपूरचं घर नियमात असल्यामुळे मला नोटीस आली नाही.
विजयामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळाल्याचे विधान फडणवीसांनी केले असूनआपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय. काहींचे चेहरे पडलेत. काही लोक बावचळलेत, काही पिसाटलेत. आपण जिंकलो आहोत. जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. त्यांनी जिंकण्याचा आनंद करायचा असतो, उन्माद करायचा नसतो. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुयात. जे असं सांगतायत की आम्हाला माहितीये की कुणामुळे हे जिंकले, त्यांना खरंच माहिती असेल तरी ते काहीही करणार नाहीत. कारण त्यांचं सरकार टिकवणं त्यांना जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला ज्यांनी मदत केली, त्यांच्यावर जर हे कारवाई करायला निघाले, तर ते निघून जातीलच, पण जे यांच्यासोबत असूनही मनाने आपल्यासोबत आहेत, तेही निघून जातील असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
सरकार चालवण्यासाठी चालवायचं आणि समाजातल्या एकाही घटकाचा विचार करायचा नाही ही अवस्था आपल्याला आज पाहायला मिळतेय. २०१९ साली मोदींवर विश्वास ठेवून राज्याच्या जनतेनं भाजपाला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसोबत सत्ता दिली होती. पण या सत्तेचा अपमान झाला. ही सत्ता बाजूला सारून आमच्या पाठीत खंजीर खुपसून जी नवीन सत्ता तुम्ही स्थापन केली, किमान ती सत्ता तरी व्यवस्थित चालवून दाखवा असे आव्हान देत किमान सरकारची दोन चांगली कामं करून दाखवा. अडीच वर्षाच्या काळात जनतेचं काम केलं अशी एकही गोष्ट सरकार दाखवू शकत नाही असा आरोपही त्यांनी केला.
या निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा विकास थांबलाय. या अंतर्विरोधामध्ये फक्त आमच्याशी लढायचं म्हणून आमच्या काळात सुरू झालेले सगळे प्रकल्प थांबवून महाराष्ट्राचं नुकसान महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Marathi e-Batmya