मुंबईः प्रतिनिधी
राज्याचे श्रध्दास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या या दोन्ही स्मारकाचे काम अद्याप पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचे काम आगामी पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचा संकल्प भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करत १ कोटी नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे भले-मोठे आश्वासन देत राज्याचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचे घोषणा भाजपाने केली. तसेच समुद्राला मिळणारे नद्यांचे पाणी दुष्काळी भागात फिरविण्याची घोषणा करत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचे जाहीर करण्यात आले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवेसेनेचा जाहीरनामा प्रसिध्द झाल्यानंतर मतदानाला अवघ्या ५ ते ७ दिवस शिल्लक राहीलेले असताना भाजपाने आपला संकल्प पत्र अर्थात जाहीरनामा आज जाहीर केला. रंगशारदा येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा, राज्याच्या प्रभारी सरोज पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये ५ लाख कोटींची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक नोंदीत बेघराला घर, शेतीला दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी अशा १६ प्रमुख संकल्पनांची अंमलबजावणी करणार असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले. तसेच या संकल्प पत्रामुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा येत्या पाच वर्षात बदलून जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राची स्थिती अतिशय विदारक होती. भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. अकार्यक्षमतेमुळे राज्यापुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जनतेने भ्रष्टाचार मुक्त, सुशासन युक्त, पारदर्शक, कार्यक्षम सरकारचा अनुभव घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतीमान केले. या संकल्प पत्राद्वारे भारतीय जनता पार्टीने आगामी पाच वर्षांत राज्याच्या विकासाची दृष्टी जनतेपुढे मांडली आहे. राज्यातील प्रत्येक घटकांचा विचार करून हे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे. या संकल्प पत्रात जी कामे करण्यासारखी आहेत त्यांचाच समावेश करण्यात आला आहे. तळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून तयार केलेल्या वास्तववादी संकल्प पात्रामुळे महाराष्ट्रात सुवर्णयुग येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवडणुकीत विरोधकांकडे भाजपा विरोधात मुद्देही शिल्लक नाहीत आणि नेतृत्वही नाही. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केला. आगामी पाच वर्षांत करावयाच्या कामांचा संकल्प आम्ही जनतेपुढे मांडत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कृष्णा, कोयना या नद्यांचे तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा कार्यक्रम येत्या पाच वर्षांत आम्ही राबविणार आहोत. मराठवाड्यासाठी ११ धरणे एकमेकांना लूप पद्धतीने जोडून या भागाची पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्याची योजना आम्ही आखली आहे. एक कोटी कुटुंबांना महिला बचतगटांशी जोडून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
Marathi e-Batmya