मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबर झटपट युती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच युतीची काळजी विरोधकांनी अथवा प्रसारमाध्यमांनी करू नये असे आवाहनही केले. मात्र निवडणूकीत प्रत्यक्ष शिवसेनेबरोबर कोणत्याही स्वरूपात युती करायची नाही असे स्पष्ट आदेश दिल्लीतील भाजपाच्या मोठा भायने राज्यातील नेतृत्वाला दिल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सुत्रांनी दिली.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक विद्यमान आमदारांसाठी भाजपाने मेगाभरती सुरू केली आहे. या पक्षांमधील अनेक आमदार आणि नेत्यांना पुन्हा आहे त्याच मतदारसंघातून निवडणूकीचे तिकिट देत निवडूण आणण्याचा निर्णयही घेतला. त्यानुसार विधानसभेतील फक्त विद्यमान आमदारांनाच भाजपाकडून मेगाभरतीत सामील करून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाचे संख्याबळ संभावित २०० जागांच्या आसपास जाणार असल्याचे एकदा निश्चित झाल्यानंतर राजकिय कुरघोडी करत शिवसेनेला युती तोडण्यास भाग पाडण्यात येणार आहे. जेणेकरून भाजपा आणि शिवसेनेला पुन्हा स्वतंत्र निवडणूका लढविता याव्यात. तसेच राज्यात पुन्हा भाजपालाच एकहाती सत्ता हाती मिळावी अशी रणनीती असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्ररित्या लढल्यास भाजपापेक्षा शिवसेनेचे जास्तीचे राजकिय नुकसान होणार आहे. तसेच भाजपाच्या तुलनेत शिवसेनेत मेगाभरतीला फारसा प्रतिसाद नाही. त्यातच ज्या उमेदवारांना भाजपात प्रवेश देता येत नाही त्यांना शिवसेनेत पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya