मनोमिलन मेळावे झाले पण भाजप-सेनेत मिलन काही होईना पाडापाडीच्या राजकारणाला सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेनेत युती झाल्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जरी घोषणा करत मनोमिलन मेळावे घेण्यात आले. परंतु या मनोमिलन मेळाव्याने भाजप कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची मने काही जुळलेली नसून भाजप कार्यकर्त्ये शिवसेनेच्या उमेदवाराला तर शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.
पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावेळी भाजपा कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनीही यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात काम केले. तर रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हरिष तुमाने यांना पाडण्यासाठी स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठवाड्यातही ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारापासून फारकत घेतली आहे. तर ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्या मतदारसंघात शिवसैनिकांनी भाजपपासून फारकत घेत स्थानिक राजकारण आणि आगामी विधानसभा निवडणूकीचे राजकारण लक्षात ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तर प्रसंगी वंचित आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली-मिरज, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर येथील लोकसभा मतदारसंघात भाजपाने शिवसैनिकांवर विश्वास ठेवण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना गोंजारण्याचे काम सुरु केले आहे. तर शिवसेनेनेही भाजपवर जास्त भिस्त न ठेवता सरळ राष्ट्रवादीतील काही नेत्यांशी हातमिळवणी केल्याचे भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत मात्र शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी सरळ सरळ एकमेंकापासून फारकत घेतल्याचे दिसून येत असून उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टीच्या विरोधात शिवसैनिकांनी छुपी आघाडी उघडली आहे. तसेच शिवसैनिकांकडून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसऱ्याबाजूला आगामी विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत काँग्रेसचे मालवणीचे आमदार अस्लम शेख यांनी काँग्रेस उमेदवारापेक्षा भाजप उमेदवाराला छुपी मदत करत असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना छुपी मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तर उत्तर पश्चिममध्येही विद्यमान भाजप खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात नाराजी असून तेथे प्रिया दत्त यांना शिवसेनेकडून मदतीचा हात मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनाही सध्या नागरीकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असून या भागातील भाजपकडून शेवाळे यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. तर ईशान्य मुंबईत शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मदत करत असल्याची माहिती पुढे येत आहे.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची ९ मार्चला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी व कृषी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *