महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटीसीईटी) सुरळीत पार पडावी, यासाठी राज्यातील पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरविण्यात आले आहे. त्यामुळे आता एमएचटीसीईटीच्या परीक्षा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये घेतल्या जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यात झालेल्या एमएचटीसीईटीच्या परीक्षेत झालेल्या चुकांसंदर्भात सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, यावर्षीची एमएचटीसीईटी परीक्षा २८ सत्रांमध्ये झाली. यातील एकाच केंद्रावरिल इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत २१ प्रकारच्या त्रुटी होत्या. त्यामुळे शासनाने लगेच ५ मे २०२५ परीक्षा घेतली आहे. तथापि, या परीक्षेत झालेल्या त्रुटीसंदर्भात जबाबदार तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांचा खुलासा असमाधानकारक वाटल्याने त्यांची सेवा एमएचटीसीइटी या सामायिक प्रवेश परीक्षेच्या गोपनीय कामाकरिता खंडित करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, एमएचटीसीइटीच्या परीक्षेत चुका होऊ नये यासाठी कुलगुरू डॉ. सुनील भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची कमिटी नियुक्त केली आहे. यात प्रश्नसंच तयार करण्याकरिता तज्ज्ञांची नेमणूक करण्याची कार्यपद्धती, प्रश्नसंचानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याची कार्यपद्धती, अशी मोठी कार्यकक्षा आहे. त्याचबरोबर यापुढे एमएचटीसीइटीच्या परीक्षा राज्याबाहेर होणार नसल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya