नो लॉकडाऊन, ओन्ली रिस्ट्रिक्शन्स कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घ्या-भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांची मागणी

पुणेः प्रतिनिधी
कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कुठेही लॉकडाऊन करणार नाही असे जाहीर करुन, जिल्ह्यांसाठी धोरणात्मक नियमावली आखावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज सकाळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन पुण्यातील प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजप पुणे शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
कोरोनावर नियंत्रण मिळवताना लॉकडाऊन होणार नाही, असे धोरणच ठरवले पाहिजे. त्यासाठी नो लॉकडाऊन, रिस्ट्रीक्शन्सची अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच, ज्या-त्या विभागात आवश्यकता आहे, तिथे नागरिकांनी काळजी घेण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन नियमावली तयार केली पाहिजे. या नियमावलीची प्रशासनाने सक्ती केली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
कोरोनावर नियंत्रणासंदर्भात टाटाने एक सर्वे करुन त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार रेस्टॉरंट, मॉल आणि उद्याने यावर बंधने घालण्याची मागणी केली आहे. त्यापैकी मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लोकांच्या संचारावर बंधने घालता येतील. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाटील यांनी पुण्यातील नाल्यांच्या संदर्भात निवेदन दिले व विस्तृत चर्चा केली. यामध्ये पुण्यातील नाल्यांवर संरक्षक भिंती बांधणे व पावसाळी कामांसाठी निधी देण्याची मागणी केली. यावेळी माननीय अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख करताना दोन टप्प्यात नाल्यांसाठी हा निधी देता येईल किंवा कसे याबाबत निर्णय करु असे स्पष्ट केले. तसेच पत्रकार व बॅंक कर्मचाऱ्यांना फ्रॅंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देऊन त्यांचे व कुटूंबातील सदस्यांचे लसीकरण करण्याबाबत ही योग्य निर्णय घेण्याची, मागणी त्यांनी केली.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *