मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त विविध कार्यक्रम कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्याचे निर्देश

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका बनवून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश दिले.

मंत्रालयात आयोजित क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान दोन ते तीन कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन १५ एप्रिल पर्यंत देण्यात यावे. महात्मा जोतिराव फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात ११ एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी युक्त खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी.

यासाठी गठीत मंत्री समितीच्या अंतर्गत वर्षभर कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे, या कार्यक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी उपसमितीची निर्मिती करावी. महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेल्या साहित्य संपदेचा बहुभाषेत अनुवाद झाला पाहिजे. जेणेकरून सबंधित भाषिक नागरिकांना त्यांच्या भाषेत साहित्य उपलब्ध होईल. शालेय शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खासगी शाळांनाही सहभागी करून घ्यावे. प्रत्येक मंत्री, विभागाने दिलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक कार्यवाही करावी.

यावेळी सबंधित मंत्री यांनी आपल्या विभागाकडील नियोजनाची माहिती दिली. तसेच हे द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त घ्यावयाच्या कार्यक्रमांबाबत सूचना दिल्या. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी बैठकीत माहिती दिली.

About Editor

Check Also

राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *