‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात विश्व स्तरावर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता आहे. यासाठी राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठ अंतर्गत ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल. ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर येथे आयोजित जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनाच्या विविध दालनांनाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार चित्रा वाघ, जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे, उपाध्यक्ष अविनाश गुप्ता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवी मुंबईतील महापे येथे देशातील अत्याधुनिक ‘ जेम्स अँड ज्वेलरी’ पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कच्या माध्यमातून ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रातील व्यावसायिकांना, निर्यातदारांना सुविधा देऊन अधिकाधिक निर्यात वाढविण्यासाठी शासन काम करेल. तसेच हे क्षेत्र रोजगाराभिमुख बनविण्यासाठी ‘जेम्स अँड ज्वेलरी ‘ संघटनेसोबत सहकार्याची शासनाची भूमिका आहे. भारतीय आभूषणे, दागिन्यांना मोठा इतिहास आहे. जगात बऱ्याच देशांमध्ये भारतीय दागिने निर्यात होतात. जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारत आघाडीवर असून ही आघाडी टिकविण्यासाठी शासनाची धोरणे त्या पद्धतीने सुसंगत करण्यात येतील.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’साठी नवीन उद्योगांना परवाना पद्धत, जागा खरेदी प्रक्रिया, सध्याच्या उद्योगांचे बळकटीकरण प्रक्रिया सोपी आणि कमी कालावधीची करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत आहे. त्यासाठी मंत्रालयात ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ वॉर रूमही तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून सुधारणा प्रकल्प कुठल्या टप्प्यावर आहे, कशा पद्धतीने करायची याबाबत नियमित आढावा घेण्यात येत असून राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनामधून भारतीय दागिन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. तसेच या क्षेत्रात नवीन संशोधन होणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार चित्रा वाघ, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रातील व्यावसायिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Marathi e-Batmya