भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताना म्हणाले की, अशोक खरातला कोणत्या पद्धतीने अटक झाली? या प्रकरणी पोलिसांनी कोणती खबरदारी घेतली? पीडित महिला खरात विरोधात तक्रार देण्यासाठी कशा पुढे आल्या? याविषयी विस्तृत माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”अशोक खरातने दैवी शक्तीचा खोटा दावा करून अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आतापर्यंत त्याची ४० कोटींची मालमत्ता समोर आली असून, त्याने १३ देशांमध्ये प्रवास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती दिली.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २० डिसेंबर २०२५ रोजी अशोककुमार एकनाथ खरात या नावाने वावी पोलिस स्टेशन जिल्हा नाशिक येथे तक्रार दिली की, आरोपी दिनेश मनाजी परब याने त्याच्या मोबाईल क्रमांक ९८२२३००३८३ यावरून व्हॉट्सॲपद्वारे फिर्यादीचा मोबाईल क्रमांक ९३२२८६४४९ वर फिर्यादीचे व एका महिलेचे चार व्ह्यू वन्स स्वरूपात फोटो प्रसारित करून सदरचे फोटो हे समाजात व्हायरल करण्याची धमकी देऊन, ते व्हायरल न करण्यासाठी पाच कोटी रुपयांची खंडणी व्हॉट्सॲप कॉलद्वारे मागितली. सदरचे फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद याने दिले आहेत. याबाबतची तक्रार दिली होती. यावरून वावी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४६८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८-२ सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००६ चे कलम ६६ ई, ६७ अ प्रमाणे दाखल करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी करून फिर्यादी अशोक खरात याचा मोबाईल सायबरकडून तपासणी केली, परंतु त्यात काही पुरावा आढळून आला नाही. तपासकामात फिर्यादी अशोककुमार खरात, दिनेश परब याच्यासोबत केलेले व्हॉट्सॲप मेसेजेस व स्क्रीनशॉट तपासकामी हजर केले व ते जप्त केले आहेत. त्याअनुषंगाने फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही. आरोपी दिनेश परब यास मा. उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे. नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल आजपावेतो तपासात पुरावा आढळून आला नाही. त्याचा सहभागाबाबत तपास सुरू आहे. हा पहिला पार्ट आहे. ज्यात त्यांनी तक्रार केली होती. ज्यातून आपल्या लक्षात ही केस आली.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की, तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सॲपद्वारे तिचा एआय जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली, असा संशय व्यक्त केला. त्यावरून शिर्डी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३१/२२६ बीएसएस २५१ २ सह आयटी ॲक्ट ६६ ई, ७६ अ प्रमाणे नीरज जाधव यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीने तिचा मोबाईल तपासकामी हजर केला नाही. तसेच तिला कोणत्या मोबाईल नंबरवरून मेसेज आला, तो ही तिला सांगता आला नाही. यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना, अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले. त्या व्हिडिओमध्ये एकूण आठ महिलांचे ३५ व्हिडिओ असल्याचे समोर आले. सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्र मंत्र वापरून अनेक महिलांश बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले. ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिंमत केली, त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती. तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता. अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता. त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडून व्हिडिओ जप्त केले असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तो पळून गेला असता, तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलन्स जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना १० मार्च २०२६ रोजी सादर केला व एअर अथॉरिटीने तत्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली. वावी पोलिस स्टेशन व शिर्डी पोलिस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, वावी व शिर्डी येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी १३ मार्च २०२८ विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना विशेष पोलिस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १७ मार्च २०२६ रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशन तक्रार दिली की, अशोक खरात याने स्वत:कडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र, तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलावून, तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन, गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन, तिला संमोहित करून, तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन, तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून, तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला. अशी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे ७३/२०२६ बीएनएस कलम ६४-१ ७४ ३५१ २ महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम ३ (१) व (२) प्रमाणे दाखल करून, आरोपी अशोक खरात यास दिनांक १७ मार्च २०२६ रोजी २३ वाजून ५९ मिनिटांनी तत्काळ अटक करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ नाशिक शहर यांनी केला. त्यात त्यांनी आरोपीचे ओकस प्रॉपर्टी या घटनास्थळाची झडती घेतली. त्या ६ लाख ५३ हजार ७११ रुपये रोख प्राप्त करण्यात आले. आरोपीच्या घराच्या झडतीत २ लॅपटॉप जप्त केले. आरोपीचे फॉर्म मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झडती घेता, त्या ठिकाणी डीव्हीआर, एक रिव्हॉल्वर, २१ जिवंत काडतूस, ५ फायर केलेले काडतूस, गट क्रमांक १०६/२०० खरेदी खताची झेरॉक्स असा मुद्देमाल मिळून आल्याने तो तपासात जप्त केला आहे. आरोपीच्या मोबाईलमधील डेटा हस्तगत करणेकामी सायबर पोलिस स्टेशनकडे पाठवण्यात आला. सदरचा गुन्हा एसआयटीकडे १९ मार्च २०२६ रोजी वर्ग करण्यात आला. आरोपीचा मोबाईल फोन क्रमांक युनिट नाशिक शहर यांनी त्याला अटक करतेवेळी १७ मार्च २०२६ रोजी ताब्यात घेतला असून, त्याच्या फोनमधील डेटा क्लोनिंगसाठी सायबर विभाग नाशिक यांच्याकडे दिला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या महिला अशोक खरात यांच्या भोंदूगिरीस बळी पडल्या होत्या. त्यांची निष्पन्न करून त्यांच्याशी संपर्क साधला. प्रकरण गंभीर असून त्याचे मीडियात उमटणारे पडसाद, पीडित महिलेची ओळख उघड होण्याची भीती, तिचे समाजात नाव खराब होण्याची भीती यामुळे प्राथमिक कुणीही महिला तक्रार देण्यासाठी पुढे धजावत नव्हती. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून, त्यांना सुरक्षेची हमी देऊन, कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगून तक्रार देण्यास तयार केले. पोलिसांनी त्यांचे कौशल्य वापरून साक्षीदाराने हजर केलेल्या व्हिडिओतून निष्पन्न झालेल्या महिलांची नावे निष्पन्न करून, त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना भेटून समुपदेशन केले. व्हिडिओमधील निष्पन्न पीडित महिलांपैकी तीन महिलांनी तक्रार दाखल करण्यास संमती दिली. त्यांच्या तक्रारीवरून तीन गुन्हे नोंद झाले आहेत. जप्त व्हिडिओत नसणाऱ्या तीन महिलांना देखील निष्पन्न करून, त्यांचेही समुपदेशन करून, त्यांच्या तक्रारीवरून तीन गुन्हे अधिकचे नोंद करण्यात आले आहेत. व्हिडिओवरून निष्पन्न असलेल्या व व्हिडिओत नसलेल्या पीडित महिलांचा शोध सुरू असून, या प्रमाणे त्यांना समुपदेशन करून, सुरक्षेची हमी देऊन, त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या पीडित महिलांचे फोटो व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती. असे सर्व व्हिडिओ स्ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे. फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्या न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख उघड होईल, असे वृत्तांकन केले आहे, त्या न्यूज चॅनल्सच्या संपादकांना बीएनएस ७२/१ अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस तत्काळ अदा करण्यात आली आहे. ज्यामुळे न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख असलेले वृत्तांकन तत्काळ बंद केले असल्याचेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रीड ॲप्लिकेशन सहाय्याने आरोपीच्या बँक खात्याबाबतची माहिती मिळणे कामी पत्रव्यवहार करण्यात आला असून, ती माहिती फास्टट्रॅक स्वरुपात प्राप्त करून घेतली आहे. त्या आधारे तपास सुरू असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आरोपीकडे केलेल्या चौकशीत, तसेच इतर प्राप्त माहितीवरून आरोपीची प्रॉपर्टी कुठे-कुठे आहे? याची माहिती संकलित करण्यात आली आहे. अशोक खरातची ३३ एकर जमीन, फार्म हाऊस, आणि इतर ठिकाणी जमिनी, फ्लॅट, पनवेल येथील ४० गुंठे जमीन, मुलीच्या नावावर असलेला पुण्यातील फ्लॅट, सिन्नर येथे मंगल कार्यालय जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत ४० कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. अशोक खरात याने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, दक्षिण आफ्रिका, इथोपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया या देशांमध्ये प्रवास केला आहे. तसेच अशोक खरातच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता या संदर्भात चौकशी सुरु आहे. आरोपीच्या शिवनिका संस्थानची चौकशी करण्यात येत आहे.
शेवटी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एसआयटीकडे वरील प्रकरणी तिन्ही गुन्हे एकत्रित तपासात आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी, आरोपीची वैद्यकीय तपासणी, आरोपीसोबत काम करणाऱ्या साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आली. आरोपीचा कारचालक, त्याच्या सोबत काम करणारे नोकर, फार्महाउसवर काम करणारे लोक, त्याच्यासोबतचे पुजारी यांचा जबाब नोंदवण्यात आला असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya