बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारावरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी दूर झाला. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये आयएएस अधिकारी आशिष शर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे एकाच रिक्त पदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून परस्पर विरोधी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली. अखेर यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत अधिकृतरित्या निर्गमित करत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले नसल्याचा खुलासा करत नगरविकास विभागाने नियुक्तीवरून निर्माण झालेला गोंधळ केला.
एस.व्ही. आर. श्रीनिवास, हे ३१ जुलै २०२५ रोजी शासन सेवेतून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. श्रीनिवास यांच्याकडे बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. श्रीनिवास यांच्या सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागामार्फत ३१ जुलै २०२५ रोजी आदेश निर्गमित केले होते. या आदेशानुसार बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार नगरविकास विभागाच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्याविषयी निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे देण्याचे निश्चित केले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने सनदी अधिकारी आशिष शर्मा यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचा आदेश जारी केला. एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांच्या नावाचे आदेश निघाल्याने गोंधळ उडाला होता.
महायुती सरकारचा ‘बेस्ट समन्वय’…
बेस्टमधील महाव्यवस्थापक पद रिक्त होताच या पदावर ‘आपल्या’ माणसाला बसवण्याची जणू स्पर्धाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या लागल्याचं दिसतंय. काल बेस्टचे महाव्यवस्थापक श्री श्रीनिवास हे सेवानिवृत्त होताच… pic.twitter.com/crt0Q7gT1K
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 6, 2025
या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने आज खुलासा केला. ‘बेस्ट वर्कर्स युनियन या कामगार संघटनेच्या पुढाकाराने बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपदानाची (ग्रॅज्युइटीची) रक्कम तातडीने विहित वेळेत मिळण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजित होते. या परिस्थितीमध्ये सामान्य प्रशासन विभागामार्फत नियमित आदेश निर्गमित करेपर्यंत महाव्यवस्थापक, बेस्ट या पदाचा अतिरिक्त कार्यभार देणे आवश्यक होते. त्यानुसार बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे देण्याबाबत नगरविकास विभागामार्फत आदेश काढण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत होती.
तथापि, या दरम्यान सामान्य प्रशासन विभागाकडून ५ ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये बेस्ट, महाव्यवस्थापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार आशिष शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे नगरविकास विभागामार्फत बेस्टचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे देण्याचे आदेश अधिकृतरित्या निर्गमित करण्यात आलेले नाहीत, असे विभागाने आपल्या खुलाशात स्पष्ट केले आहे.
Marathi e-Batmya