नागपूरः प्रतिनिधी
संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.
नागपूर येथे आज यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, यवतमाळ आणि अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत खर्गे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून सद्य राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याची माहिती घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकीय पक्ष विचारधारेवर चालतात. पदापेक्षा विचारधारा महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्षात काम करणा-या कार्यकर्त्यांना संधी मिळते. त्यामुळे सर्वांनी गट तट विसरून एकत्रितपणे संघटना मजबूत करावी आणि भाजपच्या धर्मांध विचारधारेचा पराभव करावा.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेसचा कार्यकर्ता ही पक्षाची खरी ताकद आहे. कार्यकर्ता मजबूत असेल तर संघटना बळकट होते. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देणार देऊन राज्यात पक्ष संघटना मजबूत करू.
तत्पूर्वी सकाळी नागपूर विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.
Marathi e-Batmya