मुंबई: प्रतिनिधी
राज्यावर कोरोनाचे संकट असताना साधारणत: १० दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्य मंत्रिमंडळाने प्रस्ताव पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सध्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर नियुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर अद्याप निर्णय न घेण्यात आल्याने राज्यपालांना मंत्रिमंडळाच्यावतीने पुन्हा एकदा विनंती करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.
उध्दव ठाकरे यांना मुख्यपत्री पदी कायम राहण्यासाठी विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे बंधनकारक आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व निवडणूकांची प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक घेणे अवघड झाले. त्यामुळे त्यांना राज्यपाल नियुक्त दोन जागांपैकी एका जागेवर नियुक्त करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने तशी शिफारसही केली. परंतु त्यावर अद्याप राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नाही.
Marathi e-Batmya