मुख्यमंत्री आणि पवारांमुळे अखेर बिहार, प.बंगालचे कामगार पोहोचले घरी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अडकून पडलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या कामगारांना ठाम नकार देण्यात येत होता. मात्र यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्तीशं बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधल्याने या कामगारांना त्यांच्या मुळ घरी जाता आले. बिहार आणि हावडा दरम्यान पहिली विशेष श्रमिक रेल्वे आज दुपारी धावल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच      महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास दोन लाख ४५ हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेन द्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

२२ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊन ने अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लाँकडाऊनच्या नियमांचे पालन करून १९१ ट्रेनने २ लाख ४५ हजार ०६० कामगार, मजूरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली.
पश्चिम बंगाल व बिहार
पश्चिम बंगाल मध्ये एकही ट्रेन गेली नव्हती. बिहारमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तीशः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली. आज १६ मे रोजी सकाळी ८.१५ वाजता पश्चिम बंगाल साठी बांद्रा ते हावडा ही पहिली विशेष रेल्वे ट्रेन सोडण्यासाठी आली. या दोन्ही राज्यांसाठी प्रत्येकी कमीत कमी दहा दहा ट्रेन दररोज सोडण्याची गरज आहे. या परप्रांतीय कामगारांना पाठविण्याचा सर्व खर्च मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केला आहे. यासाठी एकूण ५४.७० कोटी रुपये त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत.
आज आपल्या राज्यात जवळपास ३८८४ शेल्टर असून यामध्ये ३ लाख ७१ हजार कामगार आहेत त्यांची जेवण खान सर्व व्यवस्था राज्य शासन करत आहे.
१९१ विशेष श्रमिक ट्रेन
राज्याच्या विविध भागातून एक मे पासून १५ मे पर्यंत राज्यातील विविध स्टेशन वरून १९१ विशेष श्रमिक ट्रेन द्वारे या सर्वांना पाठविण्यात आले. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (११७), राजस्थान(९), बिहार(२६),कर्नाटक(३), मध्यप्रदेश(२१), जम्मू(२),ओरिसा(७), झारखंड(५), आंध्र प्रदेश(१) या नऊ राज्यांचा समावेश आहे.
भिवंडी ६, डहाणू १,कल्याण २, पनवेल १३, ठाणे ५, लोकमान्य टिळक टर्मिनस ३० ,सीएसटी ३५,वसई रोड ७, पालघर ३, बोरिवली ९,बांद्रा टर्मिनस १८ ,अमरावती २, अहमदनगर २,मिरज ४, सातारा ४,पुणे १४,कोल्हापूर ९, नाशिक रोड ४, नंदुरबार ४, भुसावळ १, साईनगर शिर्डी २, जालना २, नागपूर ४,औरंगाबाद ६, नांदेड १, कुर्डूवाडी १, दौंड १ या स्टेशन वरून उपरोक्त श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *