Breaking News

माकपचा सवाल, तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता? राजू शेट्टी यांचा विधानसभेसाठी तिसरी आघाडी करण्याचा मनोदय

देशाच्या आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीत तिसरी आघाडी ही धूर्त आणि मतलबी खेळी आहे. राज्यातील जनतेला महायुतीच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीच्या कचाट्यातून सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपा-प्रणित महायुतीस भक्कम पर्याय ही आणि हीच मराठी जनतेची मागणी आहे, आणि तिने तसा स्पष्ट कौल लोकसभा निवडणुकीत दिला असल्याचे माकप राज्य सचिव डॉ उदय नारकर यांनी सांगितले.

माकपचे डॉ उदय नारकर म्हणाले की, आज तिसऱ्या आघाडीची- पर्यायाची भाषा करणारे सरळ सरळ भाजपाच्या हिताचे राजकारण करत आहेत. २००९ मध्ये त्यावेळच्या रिडालोस या तिसऱ्या आघाडीच्या तिकिटावर राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातून खासदार झाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी इचलकरंजी मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉ. दत्ता माने यांना मदत तर केली नाहीच, पण लाल बावट्याच्या नेतृत्वाखालील यंत्रमाग कामगारांच्या लढ्यालाही कधी समर्थन दिले नाही. उलट ते २०१४ मध्ये भाजपाच्या दावणीला आपखुशीने गेल्याची टीका करत अशी संधिसाधू भूमिका घेणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला उमेदवारी दिली नाही, म्हणून नक्राश्रू ढाळण्याची गरज नाही. आपले हित जोपासण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खंबीर आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपाचा पराभव करण्यास पक्षाने प्राधान्य दिले आणि ते साध्य करण्यात मोलाची कामगिरी बजावल्याची स्पष्टोक्तीही यावेळी दिली.

डॉ उदय नारकर पुढे बोलताना म्हणाले की, हातकणंगले मतदारसंघात ‘मविआ’ची मते हवीत, मात्र त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत स्टेजवर येऊ नये, हा कसला बालहट्ट? तो कशासाठी होता हे तेथील निकालांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीत मविआशी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवायचे आणि प्रत्यक्षात भाजपाला मदत करायची या नाटकाचा पहिला अंक सादर करण्यात आला. आता विधानसभेच्या निवडणुकीत त्याच नाटकाच्या दुसऱ्या अंकाची तालीम सुरू होत असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना डॉ उदय नारकर म्हणाले की, “धर्मांध गिधाडांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याची” घोषणा करत शरद जोशींपासून फारकत घेतलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांना परत त्या गिधाडांच्या हवाली करू पाहात आहेत. असे त्या गिधाडांच्या हवाली व्हायला शेतकरी आणि कामगार मेलेली जनावरे नाहीत, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवले आहे. त्याचे दुसरे पाऊलही मराठी जनता आगामी विधानसभा निवडणुकीत उचलल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

भाजपा-प्रणित महायुतीच्या विरोधातील सर्व लहानमोठ्या पक्ष आणि संघटनांच्या एकजुटीचा विस्तार करत मविआ राज्यात परिवर्तन घडवून आणू शकेल, अशी एकजूट उभारण्यात माकप सतत सक्रिय राहील अशी ग्वाहीही यावेळी डॉ उदय नारकर यांनी दिली.

Check Also

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *