तमाशा फड मालकांचा पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार
मुंबई : प्रतिनिधी
सरकारवर कोणताही करोडोचा बोजा न पडणारा, केवळ आपल्या किरकोळ मागण्यासाठी तमाशा महोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेल्या तमाशा फड मालक संघटनेच्या प्रमुखांशी कोणत्याही प्रकारे सामोपचाराची भूमिका न घेता, “मुके आणि बहिरे” पणाच्या अवस्थेत असलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दर वर्षी होणाऱ्या तमाशा महोत्सवाची परंपरा यंदा खंडीत करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गेले अनेक दिवसापासून अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेसह इतर हीं लोककला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी सांस्कृतिक कार्य खात्याकडे बैठकीची वेळ मागितली. विशेषतः कार्यक्रमाचा दौरा करताना पोलिस खात्याकडून होणाऱ्या छळाला आवर घालणे, तमाशाच्या गाड्यांना टोल माफी मिळणे, वयोवृद्ध लोक कलावंतांना मानधन वाढविणे, गरजू कलावंतांना हक्काची घरं देणें, आदी मागण्यासाठी या संघटनेकडून तगादा सरकारकडे सुरू आहे. परंतु आपल्या कार्य बहुल्यामुळे संबंधी खात्याच्या प्रमुखांनी संघटनेच्या मागण्यांकडे सोयीनुसार दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या तमाशा महोत्सव आणि विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय नांदेड येथील माळेगावच्या यात्रेत तमाशा फड मालकांच्या झालेल्या बैठकीत घेतला. निदान आमच्याशी चर्चा करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अपेक्षाही यावेळी मालकांनी व्यक्त केली. परंतु सांस्कृतिक कार्य संचालनालया कडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
यासंदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिक्षक महादेव भालेराव उर्फ एम आर यांच्याशी गेले दहा दिवसापासून तमाशा महोत्सव होणार की नाही, याबाबत विचारणा करण्यासाठी कार्यालयीन दूरध्वनी आणि मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काहीच ऐकू येत नसल्याचे सांगत फोन कट करीत आहेत. अन तमाशा महोत्सवाबाबत भालेराव एक शब्द ही प्रतिक्रिया दयायला तयार नाही. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालय सध्या “मुके आणि बहिरेपणा” च्या अवस्थेत गेले आहे.
! सांस्कृतिक कार्य संचालनालयचा कला भेद..!
खरं तर कलेला जातपात नसते असे बोलले जाते. परंतु सांस्कृतिक कार्य संचालनालय कलेमध्ये ही मोठा भेदभाव करीत असल्याने लोककला क्षेत्रात प्रचंड नाराजी सांस्कृतिक कार्य खात्याच्या प्रमुखांबद्दल आहे. दरवर्षी तमाशा महोत्सव वाशी येथे होत असतो. परंतु यावर्षी तमाशा महोत्सव कुठे घ्यावा. या चर्चेच्या गुऱ्हाळामुळे तमाशा महोत्सवाचे नियोजन लांबणीवर पडले. अगदी दहा दिवसांत दशावतार नाट्य महोत्सवाचे नियोजन करून भांडुप (मुंबई) येथे दि. १७ जानेवारी पासून हा महोत्सव सुरू होवून समारोप येत्या २३ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.
Marathi e-Batmya