Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देणार श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र चा दर्जा देण्याची घोषणा

परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. तसेच आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही शिकवण त्यांनी दिली. संत शिरोमणी सावता महाराज विकास आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातील १०० कोटीचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे समाधी मंदिर असलेल्या श्री क्षेत्र अरण येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री अतुल सावे,यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आमदार प्रा.राम शिंदे आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर,आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुढे म्हणाले की, संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला तसेच समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य केले. आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठूरायाची पालखी अरण येथे येते ही ही घटना खूप महत्त्वाची आहे व १२९५ मध्ये अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत, असे सांगितले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या समाजाला ही संतांची नितांत गरज आहे. आपल्या राज्यातील समाज जाती-जातीमध्ये विखंडित होत आहे. मतांच्या राजकारणामुळे समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. सर्वांना सोबत घेऊन एकसंघ समाज निर्माण करण्याचे जी संतपरंपरेची विचारसरणी होती ती विचारसरणी अंगीकरणाची गरज आहे त्यातूनच एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकेल, मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराजांचे मराठीत लिहिलेले अभंग महत्वपूर्ण पुरावा असल्याचे यावेळी सांगितले.

पुणे येथील भिडे वाडा केस राज्य शासनाने जिंकलेली असून या वाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही शिकवण त्यांनी दिली. संत शिरोमणी सावता महाराज वास्तुशिल्प आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच या भागाचा विकास होऊन भक्तांना येथे चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशी ग्वाहीही यावेळी दिली.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात भिडे वाड्याचा निकाल राज्य शासनाच्या बाजूने लागला असून १५ ऑगस्ट २०२४ नंतर २०० कोटीच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन प्रधान मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्याचा मानस मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून दिलेला आहे शासनाचा हा निर्णय म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेच काम शासन नेटाने पुढे नेत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य शासन लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीला मोफत वीज, मागेल त्याला सौर पंप, तीन सिलेंडर मोफत योजना, मुख्यमंत्री तीर्थटन योजना अशा योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आमदार योगेश टिळेकर व आमदार राम शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले.

पुस्तक प्रकाशन-

संत शिरोमणी सावता महाराज यांच्यावर आधारित असलेले “संत सावता माळी अभंग व विचार” या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाले. या पुस्तिकेच्या लेखिका प्रोफेसर सुवर्णा चव्हाण गुंड या आहेत.

संत सावता महाराज भक्तनिवास वास्तु शिल्प कामाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत सावता महाराज भक्त परिवार मेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ व विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *