सोलापूर – माळशिरसः प्रतिनिधी
सोपल साहेब उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला गेलात… वाह रे विश्वासू सहकारी… लोक कसा विश्वास ठेवतील तुमच्यावर अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा समाचार माळशिरस येथील जाहीर सभेत घेतला.
विधानसभेमध्ये जेवढ्या वेळेला सोपलसाहेब बोलले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी शिवसेनेवरती टीकाच केलेली आहे आणि आज ते त्यांच्या दारी बंधन बांधायला गेले. शिवबंधन बांधायला गेलेल्या सोपल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतानाच विश्वासू बोलणार्या दिलीप सोपल हे सत्ता बघून उडी मारून इकडे आले आहेत हे कळल्याशिवाय राहणार नसल्याची टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री साहेबांना पक्षावर आत्मविश्वास असेल तर महाजनादेश यात्रा काढावी लागली नसती असा टोला लगावत सीतेवर शंका आल्यावर रामाने काय केलं हे आपल्याला माहीत आहे. तशीच ईव्हिएम बंद करुन बॅलेटवर निवडणूक घेण्याची अग्नीपरिक्षा द्या असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.
या सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना येणाऱ्या निवडणूकीत जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले.
सभेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी आपले विचार मांडले. यावेळी माळशिरस येथील पक्षकार्यालयाचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
Marathi e-Batmya