केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. विधानपरिषदेच्या पाच सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे या सर्व जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या पाच जागांसाठी पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात येणार आहे.
विधान परिषदेचे सदस्य अमश्या पाडवी (शिवसेना शिंदे गट), प्रवीण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर (भाजपा) आणि राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांनी विधानसभा निवडणुकीत विजय झाला. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ रोजी, प्रवीण दटके यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी, राजेश विटेकर यांचा कार्यकाळ २७ जुलै २०३० रोजी, रमेश कराड यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी आणि गोपीचंद पडळकर यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार होता. मात्र काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत या पाचही जणांचा विजय झाला. त्यामुळे नियमाप्रमाणे विधानसभा किंवा विधान परिषद सभागृहापैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून राहता येते. त्यामुळे विधानसभेवर निवडणून आल्याने विधान परिषदेच्या सदस्यांचा या पाचही जणांनी राजीनामा दिला.
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना १० मार्च रोजी जारी केली जाईल. १७ मार्चपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जांची छाननी १८ मार्च रोजी होईल आणि उमेदवार २० मार्चपर्यंत आपली नावे मागे घेऊ शकतील. पाचही जागांसाठी २७ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल आणि मतमोजणी सायंकाळी ५ वाजता सुरू होईल आणि निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
विधान परिषदेवर नव्याने निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांना पाच तीन नवनिर्वाचित सदस्यांना एक ते दीड वर्ष, एका सदस्याला दोन वर्षांसाठी आणि एका सदस्याला पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ७८ आहे. यापैकी ६६ सदस्य मतदान प्रक्रियेद्वारे निवडले जातात, तर १२ सदस्यांद्वारे नामनिर्देशित केले जातात.
अमित ठाकरे यांना संधी ?
या पाच रिक्त जागांसाठी विविध पक्षांकडून कोणत्या नेत्यांना उमेदवारी दिली जाते हे पाहणे मनोरंजक ठरेल. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपा आणि मनसेमध्ये युती होऊ शकते. अशा परिस्थितीत, भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवू शकते अशी अपेक्षा आहे. अमित ठाकरे यांनी मुंबईतील माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Marathi e-Batmya