शेतकरी स्वतः चं सरण रचून जीवन संपवतोय

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका

सोलापूर – भोसे : प्रतिनिधी

आज शेतकरी स्वतः चं सरण स्वतः रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. इतकी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आज मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसे येथील जाहीर सभेत भाजप सरकारवर केली.

तिसऱ्या टप्प्याच्या तिसऱ्या दिवसातील पहिली सभा भोसे येथे प्रचंड गर्दीमध्ये  पार पडली.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील,माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

आज वर्तमानपत्रात भाजपचा नवा घोटाळा  डीएचएफएल कंपनीच्या माध्यमातून ३१ हजार कोटी रुपयांचा समोर आला आहे. यामधील ३० कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा झाले असून जनतेचा हा पैसा बँका आता वसूल कसे करुन देणार हेही आता जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली.

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू म्हणत होते. परंतु चार वर्षे झाली सातबारा कोरा झाला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर आंदोलने केल्यानंतर सरकारला जाग आली आणि नंतर सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. परंतु हे सरकार इतकं खोटं बोलतं की जाहीर केलेली कर्जमाफीही अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.  

इमानदार चौकीदार आज देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी देशाच्या चौकीदाराचा समाचार घेतला. २ कोटी नोकर्‍या देणार म्हणून आजची ही तरुणाई ‘हर हर मोदी घर घर मोदी’ म्हणत उड्या मारत होती. परंतु साडेचार वर्षांत नोकरीच्या आमिषाने तरुणाला फसवलं हे लक्षात आल्यावर आज हिच तरुणाई दबक्या आवाजात बोलत आहे साधी सोयरीकही जुळली नसल्याचे सांगत दिवसाढवळ्या जनतेच्या पैशाची लूट केली ते भाजपवाले कुठल्या तोंडाने मत मागायला येणार अशी विचारणाही त्यांनी केली.

या सभेत खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे यांनी आपले विचार व्यक्त केले.

आघाडीची कर्जमाफी मिळाली पण भाजप सरकारची अजून नाही- जयंत पाटील

देशात स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी कर्जमाफी कुणी केली असेल तर तुमचे, माझे नेते शरद पवारसाहेबांनी… जवळजवळ ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकर्‍यांना मिळाली परंतु आजच्या भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली नाही असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

कष्ट करणार्‍या शेतकऱ्यांच्या हातात पैसे द्यायला हे सरकार आज तयार नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळाला, तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणारे… नियंत्रण ठेवण्यासाठी असलेला नियोजन आयोग मोदी सत्तेत आल्यावर बंद केले. मोदी सरकार सत्तेत आल्यावर मनमानी खर्च करण्याच्या परवानग्या राज्यांना मिळायला लागल्या असून पहिले उदाहरण म्हणजे बुलेट ट्रेनचे असल्याची टीका त्यांनी केला.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *