अखेर सीईटी परिक्षेचे वेळापत्रक जाहिर ! या अभ्यासक्रमांसाठी होणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील विविध पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी परिक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पुढे ढकलण्यात आली. मात्र आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने या परिक्षा घेण्यासंबधीचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

मंत्रालयातील मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या परीक्षांसाठी प्रती दिवस जास्तीत जास्त प्रती दिन ५० हजार संगणक उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यातील २५ हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार सेशन संख्या निश्चित करण्यात येईल. ही प्रवेश परीक्षा राज्य शासनाने कोविड-१९ बाबत जाहीर केलेल्या सूचनांच्या नियमांचे पालन करुन घेण्यात येणार आहे. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकीटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

८६ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र मिळणार आहेत व १४ टक्के विद्यार्थ्यांना उर्वरीत विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येईल व अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबर नंतर सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सीईटी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन  या परीक्षा १५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहेत.

मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा १६,१७ व १८ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहेत.

बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा २० सप्टेंबर २०२१ ते १ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान होणार आहेत.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (५ वर्ष), बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहेत.

बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन ४, ५, ६ आणि ७ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(३ वर्ष ) ४ व ५ ऑक्टोबर २०२१, बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा ६ व ७ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहेत.

बॅचलर ऑफ फाईन आर्ट ९ व १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे’ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रु. ८ लाख इतकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

About Editor

Check Also

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *