राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी ४८ तासापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे विनोद तावडे यांना विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्ये आणि हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांनी केला. त्यानंतर तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे आणि भाजपाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे तणावग्रस्त घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांची आणखी कुमकही विवांता हॉटेल्सच्या परिसरात पोहोचली.
त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपास कारवाईत काही पैसे आणि डायऱ्या सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या ताब्यात घेण्यात आल्या असून याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
यासंदर्भात पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले म्हणाल्या की, साधारणतः १२.३० वाजता भाजपाचे काही कार्यकर्त्ये विवांता हॉटेल्सवर पोहोचल्याचे कळाले. तसेच त्यांच्यात राडा सुरु असल्याची माहिती मिळताच आम्ही पोलिसांची काही कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचलो. आणखी सात आठ मिनिटात आणखी पोलिस आले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर भाजपा आणि बहुजन विकास आघाडीचे लोक होते. आम्ही हॉटेलच्या काही रूम पाहिल्या तर तेथे काही रक्कम आणि डायऱ्या सापडल्या. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात आम्ही दोन गुन्हे दाखल केले. तसेच तिसरा गुन्हा दाखल करत असल्याचेही यावेळी सांगितले. या ठिकाणी घोषणाबाजी झाली. पण मारामारी किंवा इतर कुठलाही प्रकार झाला नाही. पोलिसांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा पाच ते १० मिनिटात पोलिस पोहोचले. जे पैसे आणि डायऱ्या मिळाल्या आहेत त्या जप्त करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यातील शाब्दीक चकमकीनंतर विनोद तावडे हे त्यांच्या गाडीत एकटेच बसले होते. त्यानंतर ते त्यांच्या गाडीतून उतरले आणि हितेंद्र ठाकूर यांच्या गाडीत जाऊन बसले. यावेळी क्षितीज ठाकूर हे ही त्या गाडीत होते. मात्र प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या तिघांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघांनीही उडवा उडवीची उत्तरे देत निघून गेले.
दरम्यान, पोलिसांनी आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजत असून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदविण्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
Marathi e-Batmya