हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाला सेवेतून बडतर्फ करून अटक करा

पेपरफुटी प्रकरणी संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरून न्याय मागत असताना पोलिसांचे वागणे मात्र ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्यानुसार नसून त्याच्या उलटे ते वागत आहेत. पोलीस गुंडगिरी करत आहेत, लहान मुलांवरही बेछुटपणे लाठीहल्ला करत आहेत, मुलींवरही लाठीहल्ला करत आहेत. पोलीस हे बळाचा वापर करून लोकशाहीने आंदोलनाचा दिलेला अधिकार चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, हे तात्काळ थांबले पाहिजे. महाराष्ट्रात हे पोलीसराज काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक सदानंद दाते व मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून सुरु असलेल्या दडपशाहीच्या घटना थांबवणिण्याची मागणी केली. तसेच पत्रकारांना वार्तांकन करताना अडवणे, धक्काबुक्की करणे, ताब्यात घेणे यासारख्या घटना थांबविल्या पाहिजेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस अत्याचाराचे अनेक प्रकार उघड झाले आहेत, पोलिसांनी त्यांचे काम कायद्यानुसार करावे, सरकारचे हस्तक असल्यासारखे वागू नये. जे चालले आहे ते ताबडतोब थांबवले पाहिजे. तसेच राज्यात ड्रग्जचे रॅकेट सुरु आहे, ते पोलिसांकरवीच चालवले जात आहे काय, असा संशय आजच्या एका व्हिडिओमुळे बळावत आहे. विद्यार्थ्यांवर ड्रग्जचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या या पोलिसाला सेवेतून तात्काळ बरखास्त करून अटक करा व त्याची चौकशी करा अशी मागणीही यावेळी केली. या पोलिसाची चौकशी सुरु असून अहवालानंतर कारवाई करू असे महासंचालक आणि पोलीस आयुक्तांनी सांगितले. तसेच राज्यातील सर्व पोलीस अधिक्षकांना सुचनाही देण्यात येतील असेही आश्वस्त करण्यात आले आहे, असेही सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पेपरफुटी प्रकरणी तरुण अत्यंत आक्रमक झालेला असून देशभर त्यांचा आक्रोश दिसत आहे. राहुल गांधी यांनीही हाच मुद्दा गांभिर्याने घेत सर्वात आधी छात्रों की गुंज हे अभियान सुरु केलेले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष सातत्याने या प्रश्नी सर्व जिल्ह्यात आंदोलन करत आहे. या सर्वांचा उद्देश हा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व परिक्षा पद्धतीत सुधारणा करावी हा आहे. अनेक पक्ष व संघटना आंदोलन करत आहेत. याप्रश्नावर महाविकास आघाडी एक बैठक घेऊन आंदोलनाचा पुढचा कार्यक्रम जाहीर करेल, असेही सांगितले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कुंभकर्ण जागा झाला हे दोन घटनातून दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व प्रकरणावर एक ट्विट केले आहे, ते विधान खोटारडेच आहे तर दुसरीकडे अण्णा हजारे सुद्धा जागे झाले आहेत आता अण्णांनी पुन्हा झोपी जावू नये, असा उपरोधिक टोलाही लगावला.

या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे, ॲड. कल्याणी माणगावे यांचा समावेश होता.

About Editor

Check Also

congress-protest-Mumbai

विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज आणि विरोधी पक्षनेत्याला दिलेल्या वर्तणुकीविरोधात काँग्रेस आक्रमक, भाजपा कार्यालयावर धडक.. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, देशातील तमाम विद्यार्थ्यांचा अपमान, मोदी व शाह यांनी माफी मागावी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR त्वरित मागे घ्या. लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार, मोदी हटाव देश बचाव..

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *