जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची गुप्त भेट? भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली, या दोन नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीवेळी भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सुध्दा उपस्थित होते. जयंत पाटील यांनी या गुप्त भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आपण बावनकुळे यांची भेट घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकीकडे राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण, परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणाने राज्यातील राजकीय, सामाजिक  वातावरण ढवळून निघाले असताना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेल्या जयंत पाटील यांनी मात्र या सर्व विषयांवर चुप्पी धरल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील कार्यक्रमास आवर्जुन उपस्थिती लावली होती. नितीन गडकरी यांच्या सोबतच्या या कार्यक्रम भेटीनंतर जयंत पाटील हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. परंतु जयंत पाटील यांनी मात्र यासंदर्भातील बातम्या निरर्थक असल्याचे म्हटले होते. आता सोमवारी मध्यरात्री जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची गुप्त भेट घेतल्याने पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *