भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का?… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

अहमदनगर: प्रतिनिधी

भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले असता जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हा सवाल केला.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोप करत या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपामध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं हे एकदा ईडीने जनतेला सांगावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत तो मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला. हे जाणूनबुजून केले जात आहे. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. त्यांनी पैसे घेतले नाही असे अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही महिन्यापासून भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडीतील मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. तसेच प्रत्येक मंत्र्यांवर ठरवून त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांनी आरोप केले की लगेच ईडी, सीबीआयच्या कारवाईला सुरुवात होते. भाजपाकडून आतापर्यत जांच्यावर आरोप करण्यात आले त्यातील बहुतांश जण भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चौकशीच्या फाईली ईडी आणि सीबीआयकडून बंद झाल्या. मात्र जे गेले नाहीत त्यांच्या मागे ससेमिरा कायम चालू राहीला आहे.

यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे भाजपामध्ये गेलेत त्यांना केंद्रीय यंत्रणांचे संरक्षण आहे का? असा सवाल करत याप्रश्नी ईडीनेही खुलासा करावा अशी मागणी केली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *