Breaking News

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना सवाल, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार भूमिका घेता का? अखेर प्रश्न राखून ठेवण्याची राज्य सरकारवर आली पाळी

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास सुरु होताच विरोधी पक्षनेते  अजित पवार यांनी ताराकिंत प्रश्न आपण पाठविला होता. मात्र त्यातील प्रश्नाशी संबधित असलेले दोन मुद्दे परस्पर वगळले. हे मुद्दे का वगळले असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अजित पवार यांनी  करत हा मुद्दा आपण पॉईंट ऑफ इर्फोरमेशन अंतर्गत विचारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी केली. त्यावर नार्वेकर यांनी सदर प्रश्न राखून ठेवता येत नाही असे सांगत प्रकरणी कोणत्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले याचा शोध घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

परंतु विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे अखेर राहुल नार्वेकर यांना प्रश्न राखीव ठेवण्यात आल्याचे जाहीर करावे लागले.

वास्तविक पाहता विरोधकांकडून प्रश्न राखून ठेवण्याची मागणी करण्यात येत असतानाच सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात आले. ते येताच त्यांनी प्रश्न राखून ठेवण्यास हरकत नसल्याचे जाहिर केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही प्रश्न राखून ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या या कृत्यावर आक्षेप घेत उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार अध्यक्ष महोदय निर्णय घेतात का असा सवाल उपस्थित केला.

यावेळी बोलताना काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी अध्यक्षांच्या वर्तनाबाबत बोलताना म्हणाले की, जेव्हा एखादा अडचणीचा विषय असतो त्यावेळी न्यायालयात प्रकरण असतानाही राज्य सरकारला भूमिका मांडू देण्यासाठी सोयीची भूमिका घ्यायची आणि विरोधकांकडून त्यावर प्रश्नांची विचारणा होवू लागली की मग न्यायालयात प्रकरण आहे असे जाहिर करायचे आणि विरोधकांना बोलू द्यायचे नाही अशी सोयीची भूमिका का घेतली जातेय असा सवाल उपस्थित केला.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांचा किस्सा सांगत सभागृह सर्वोच्च आहे. न्यायालयातील विषय न्यायालयात पण सभागृहात एखाद्या विषयावर चर्चा करायला काय हरकत आहे असा सवाल केला.

त्यानंतर अजित पवार यांनीही सोयीने भूमिका घेणे अगदी चुकीचे आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या घोटाळ्याशी संबधित असलेल्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे तसेच हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणी केली.

त्यानंतर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यानुसार सदरचा प्रश्न राखून ठेवत असल्याचे जाहिर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत