मुंबई : प्रतिनिधी
गेल्या चार वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि करार केले. मात्र ते मूर्त स्वरुपात आलेच नसल्याची टीका करत एकाही प्रकल्पाची विट रचली नाही. त्यामुळे मी गेलो तर उद्घाटनालाच जाईन असे सांगत ‘मेकिंग महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ झाला, अजून बरेच होतील. पण त्यात होणार्या हजारो कोटींच्या गुंतवणूकीतील किती टक्के मोदीकडे असे सूचक वक्तव्य करत अर्थात त्या पळालेल्या मोदीकडे जाणार याकडेही लक्ष ठेवले पाहिजे असा उपरोधिक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लगावला.
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आमदार डॉ. नीलम गोर्हे यांच्या ‘शिवसेनेतील माझी २० वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकर्यांचे प्रश्न, शरद पवार यांची बुधवारची मुलाखत, नीरव मोदीचा बँक घोटाळा, मॅग्नेटीक महाराष्ट्र, नाणार प्रकल्प, आरक्षण अशा विविध मुद्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हजारो कोटी रुपये बुडवून मोठे उद्योगपती पळतात आणि कर्ज माफ करण्यासाठी शेतकरी देह सोडतात. केवळ मंत्रालयालात जाळ्या बसवून या आत्महत्या थांबणार नाहीत. तर सरकारच्या कारभारालाच भोकं पडल्याचा टीका करत ती कारभाराची भोके आधी आधी बुजवा अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.
पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्याबाबत केंद्र सरकार बोलत नाही. त्यावर बँकांचे घोटाळेच नव्हे तर राफेल घोटाळा, टूजी स्कॅमबद्दलही सरकारने उत्तर द्यायला हवे अशी मागमी करत बँकांच्या घोटाळ्यात राफेलचा घोटाळा दडवला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केली.
युती न करता आगामी निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असून महाराष्ट्रातील जनतेनेही त्याला पाठिंबा दिला आहे असे सांगत शिवसेनेने स्वबळावर लढावे ही जनतेचीच इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना खासदार पंतप्रधान, वित्तमंत्र्यांना भेटणार
नीरव मोदी प्रकरणानंतर देशातील जनतेत बँकांबद्दल संशयाचे वातावरण आहे. मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक आपली आयुष्याची कमाई बँकांमध्ये ठेवतात. सरकार गळे दाबून सर्वसामान्यांकडून कर वसूल करते. मग घाम गाळून कमावलेल्या पुंजीची जबाबदारीही सरकारने घेतलीच पाहिजे असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार यासंदर्भात लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांना अटक करतांना आपुलकी कुठे गेली होती?
शरद पवार यांची बुधवारची मुलाखत पाहिली का असे पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर आपण चोरूनही ती मुलाखत पाहिली नाही असे सांगत ठाकरे कुटुंबियांशी आपली जवळीक असल्याचे पवार या मुलाखतीत म्हणाले होते. पण हेच पवार सत्तेवर असताना २००० साली ९२-९२ च्या ‘सामना’तील अग्रलेखावरून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनाप्रमुख त्यावेळी ७० वर्षांचे होते. त्यावेळी पवारांची ही आपुलकी कुठे होती? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
Marathi e-Batmya