अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’ केंद्र शासनाच्या साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना

भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह २ ते ८ एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत ८ लाख ८० हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी ७ दिवसांत किमान ४ तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास ३५ लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये राज्यातील ३६ जिल्हे, ३२ विभाग, आणि ६ विभागीय कार्यालये यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे असेल.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी

साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम Mission Karmayogi चा एक भाग असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी आयोजित केला जातो. एक आठवडाभर आयोजित केला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे,वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.

महा-साधना सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे iGOT Karmayogi App द्वारे  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येईल. अधिकारी आणि कर्मचारी आपले काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृध्दी होण्यास मदत होईल.या अभ्यासक्रमांमुळे प्रत्येकाला स्वत:ची क्षमता ओळखून त्यानुसार कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते.

महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत

बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या शासकीय कामकाजात सुद्धा विविध डिजिटल प्रणाली, ॲप्सचा वापर होत आहे. महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात वापर, नागरिक केंद्रित सेवा  आणि पारदर्शकता वाढविण्यास या सप्ताहाची मदत होणार आहे.

या सप्ताहाच्या अनुषंगाने राज्यातील विविध शासकीय कार्यालये. जिल्हा कार्यालये यामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन त्यांना नेमून दिलेले अभ्यासक्रम या काळात पूर्ण करणे गरजेचे राहील. पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किमान ४ तास असणे अनिवार्य आहे. सर्व अभ्यासक्रम २ ते ८ एप्रिल दरम्यान पूर्ण करणे गरजेचे असून कर्मयोगी भारत पोर्टलवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (या विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालये) तसेच विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा) या सर्वांनी साधना सप्ताहात एकूण ४ तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे राहील. विशेष म्हणजे साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT) पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे विभागांना महाराष्ट्रात मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *