दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची माहिती देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत दु. १२ ते रात्रौ ९.३० या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिली.

महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवा’ला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आता हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून ‘हुरडा पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे.

संक्रांतीचा गोडवा आणि हुरड्याचा खमंग स्वाद

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात ‘तिळगूळ’ आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर हुरडा भाजून आनंद साजरा केला जातो, तसाच अनुभव येथे दिला जाणार आहे. हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप, ताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी,भरीत भाकरी, बटाटेवडा, भजी सोबतच ऊस, बोरं, ओला हरबरा अशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहे. थंडी, शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वाद, असा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

शहर आणि गाव यांना जोडणारा हा भावनिक पूल दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे. ९ ते ११ जानेवारी दरम्यान नवीन महाराष्ट्र सदन येथे होणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची ९ मार्चला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी व कृषी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *