मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद‌्घाटन राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी ७५,००० प्रशिक्षणार्थींना ‘ मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामधून एकूण २,५०६ तुकड्या सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या तुकडीचे ऑनलाईन उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, तरुणांना अल्प कालावधीत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन उद्योगाच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, युवांना कौशल्याधिष्ठित स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण  होण्यासाठी महिला उमेदवार व ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या प्रमाणावर कौशल्य प्रशिक्षणाची उपलब्धता करून देणे. आधुनिक तंत्रज्ञानातील नवीन व्यवसायांमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असेही सांगितले.

प्रवेश प्रक्रियेसाठी कार्यपद्धती निश्चित

पुढे बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालय केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांचा  उपयोग करून संस्थेच्या वेळे व्यतिरिक्त वेळेत मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली असून ऑनलाईन प्रवेश प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. अल्पमुदत अभ्यासक्रमांमध्ये २५ टक्के जागा संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित जागा बाह्य उमेदवारांना उपलब्ध असतील. प्रशिक्षण शुल्क रु. १००० ते ५,००० प्रति महिना इतके आकारण्यात येईल. शासनाच्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

काळानुरूप बदलते अभ्यासक्रम

मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमांतर्गत विविध नवयुगीन व पारंपरिक रोजगाराभिमुख अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. यामध्ये  अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, एरोस्पेस स्ट्रक्चर फिटर, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ड्रोन तंत्रज्ञान, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजंस, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल रिपेअर टेक्निशियन इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

अभ्यासक्रमासाठी पात्रता

मंगल प्रभात लोढा पुढे बोलताना म्हणाले की, या अभ्यासक्रमांसाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेले व आय.टी.आय.पूर्ण केलेले विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षणातील पदविका,पदवी व इयत्ता १० वी व १२ वी शिक्षण घेत असलेले व पूर्ण केलेले विद्यार्थी यांचा समावेश असेल. शासनाच्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा

सवलतीच्या शुल्कात चालविल्या जाणाऱ्या या रोजगाराभिमुख अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर  नोंदणी करावी. अधिक महिती व प्रवेश नोंदणीसाठी  जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा  शासकीय तांत्रिक विद्यालयाला संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

उदयोन्मुख क्षेत्रातील अभ्यासक्रमांमध्ये महिला उमेदवारांसाठी समर्पित ३६४ बॅचेस. इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, एआय, इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४०८ बॅचेस आहेत. आगामी कुंभमेळ्यासाठी “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” ट्रेडच्या दोन तुकड्या असतील. गडचिरोली औ. प्र संस्था मध्ये ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिकचा व्यवसाय अभ्यासक्रम. हरंगुल लातूर येथील संवेदना दिव्यांग खासगी आयटीआय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गृह उपकरणे, टॅली आणि फॅशन तंत्रज्ञानाचे विशेष अभ्यासक्रम. वाढवण बंदरासाठी प्रशिक्षित ड्रायव्हर उपलब्ध  करून देणारे प्रशिक्षण, ग्रीन हायड्रोजन प्रॉडक्शन व्यवसायाकरिता आठ तुकड्या, आयटीआय दादर (मुलींची) येथे सेमीकंडक्टर टेक्निशियन व्यवसाय सुरू होणार आहेत. महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर, गोंवडी आयटीआय येथे व शासकीय टेक्निकल हायस्कूल अमरावती व नागपूर येथे ॲडव्हान्स वेल्डिंग, अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड ॲडव्हान्स सीएनसी, इंटरनेट ऑफ थींग्ज  हे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *