मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाचे नेते तथा समर्थक मनोज जरांगे पाटील यांच्या सततच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण न देण्यामागे त्यावेळचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा जाहिर आरोप केला होता. त्यामुळे मात्र आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले असल्याने आता मराठा समाजाला ते आरक्षण देणार की नाही असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित करत आता खरी मजा येणार असे आव्हानही यावेळी दिले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या आव्हानानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय संपल्यावर मी शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर कसा मिळत नाही हेच मी बघणार आहे. त्याचबरोबर राज्यातील धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नही हाती घेणार असून या दोन समाजाला आरक्षण मिळत नाही ते बघणार आहे. मराठा समाजाच्या एकीमुळे जवळपास दोन कोटी मराठा समाज आरक्षणामध्ये गेला आहे. येत्या २५ जानेवारी पासून मी पुन्हा उपोषणाचे आंदोलन करणार आहे. उपोषण किती सहन होईल आताच सांगू शकणार नाही. पण मी समाजासाठी मरायला तयार असल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता काही जण म्हणतायत की पुन्हा तेच महायुतीचं सरकार आलं. मग आरक्षण देतील कसे असा सवालही करत आहेत. पण आता खरी मजा येणार आहे. खरा हिशोब चुकता करण्याची आता होऊ द्या, इतके दिवस मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते दुसऱ्याला पुढे करत होते. तसेच मी तर मराठा समाजाला आरक्षण द्या असे ते म्हणत जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत होते. आता समजेल की मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही ते. असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता एकप्रकारे आव्हान दिले.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर देताना म्हणाले की, मराठा आरक्षण हा काही मजा घेण्याचा विषय नाही. आरक्षण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतला तो आम्ही तिघांनी (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) घेतला. तसेच आमच्या तिघांच्याही भूमिकेत कोणताही बदल किंवा अंतर नाही. त्यामुळे यापुढेही जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही तिघे मिळूनच निर्णय घेऊ असेही यावेळी सांगत मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले.
Marathi e-Batmya