मंत्रालयातील तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा सरकारच्या विरोधात हल्ला बोल

लिपिकांना केंद्राच्या धर्तीवर पगार द्या

मुंबई : प्रतिनिधी 

राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या तृतीय श्रेणीतील लिपिक-टंकलेखक कर्मचाऱ्यांना केंद्राच्या वेतन पध्दतीप्रमाणे वेतन मिळावे यामागणीसाठी मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी आरसा गेट समोर सरकारच्या विरोधात हल्ला बोल केला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत अचानक लिपिक आणि टंकलेखकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. आंदोलकांच्या घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता.

तृतीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेने राज्य सरकारकडे वारंवार केंद्राप्रमाणे २४००ची पे ग्रेड मिळावी यासाठी पाठपुरावा केला. पण शासनाने या मागणीकडे डोळेझाक केल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचे मंत्रालय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मंजुळे यांनी यावेळी सांगितले. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या के.पी. बक्षी समितीने लिपिक आणि टंकलेखकांना केंद्रीय पे ग्रेड देण्याची शिफारस केली. मात्र याकडे शिफारसींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुळीक यांनी सांगितले. 

शासनाकडे केंद्रीय पे ग्रेडच्या मागणीसाठी वारंवार संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही यासंदर्भात दोन वेळा भेट घेतली. पण कर्मचाऱ्यांची मागणी अद्याप मान्य  झालेली नाही. त्यामुळे आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून पुन्हा याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ६ आणि ७ मार्चला राज्यभरातले लिपिक आणि टंकलेखक सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याचा इशाराही मुळीक यांनी दिला.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *