फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रीसायकल कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले, फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, सहाय्यक सजू नायर, फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा आदी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीखालील जुना ससून डॉक, महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या अंतर्गत नवीन डॉक, आज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उभे आहे. सुमारे १,५६० नोंदणीकृत मोटार चालवलेल्या मासेमारी नौका आणि सरासरी वार्षिक ५० ते ६० हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादनासह, ससून डॉक महाराष्ट्र तसेच भारताच्या मासेमारी अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षांत येथे नेट मेंडिंग शेड, वर्कशॉप, भूमिगत पाण्याची टाकी, पाणीपुरवठा पाईपलाईन, पंप हाऊस, संरक्षण भिंत, सार्वजनिक शौचालये आणि सुरक्षा रक्षक घराचे नूतनीकरण, कचराकुंड्यांची व्यवस्था करणे, जुन्या संरचना पाडणे, इलेक्ट्रिकल सबस्टेशनसाठी बांधकाम आदी कामे करण्यात आली आहे. सध्या बर्फ संयंत्र, घाटाच्या भिंतीचे मजबुतीकरण, मच्छिमारांसाठी विश्रांती कक्षांचे बांधकाम आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे प्रगतीपथावर आहेत.

नितेश राणे म्हणाले की, ससून गोदीला आधुनिक, कार्यक्षम, स्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत मासेमारी बंदरात रूपांतरित करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या आधुनिकीकरण उपक्रमाचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाचा विस्तार करणे, डिजिटायझेशनला प्रोत्साहन देणे, सुधारणा करणे असल्याचेही म्हणाले.

मंत्री नितेश राणे म्हणाले, या तीनही कंपन्या ससून मासेमारी बंदराला सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक करण्यास काम करतील. प्लास्टिक कचरा पुनर्वापर, टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्वापर आणि क्षमता बांधणीद्वारे नेट दुरुस्ती प्रणाली मजबूत करण्यास मदत होईल. ही भागीदारी केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जागतिक मानकांनुसार ससून डॉकला आदर्श मासेमारी बंदर बनवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.

शेवटी बोलताना नितेश राणे म्हणाले की, मच्छीमारांच्या कल्याणासाठी, मत्स्यव्यवसायाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि शाश्वत किनारी विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. ससून डॉक मच्छीमार समुदायासाठी प्रगती, नावीन्य आणि समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही केले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, भारत अमेरिकेचे ५१ वे राज्य आहे का? तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर हल्लाबोल !

अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास ३० दिवसांची “परवानगी” दिल्याच्या वृत्तानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *